नांदुरा (जि. बुलडाणा): येथील बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांना अचानक ३ ऑक्टोबरला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती ७ ऑक्टोबरला समोर आली. नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दुसरीकडे कुठलीही नोटीस न बजावता तथा म्हणणे मांडण्याची संधी न देता, अचानक हे निलंबन करण्यात आले आहे. पासची क्रमवारी चुकल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे ते बुलडाणा विभागीय सचिव असून, जळगाव आगाराने ३ ऑक्टोबरला त्यांना निलंबित केले. २१ सप्टेंबर रोजी पासच्या क्रमवारीत झालेल्या घोळामुळे अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वास्तविक, त्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी देणे क्रमप्राप्त होते. तसे न करता आगार व्यवस्थापकांनी ही कारवाई केली आहे. निलंबनकाळात त्यांना जळगाव जामोद आगारात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात गायकी यांनी २१ सप्टेंबरला प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले. संघटना व कर्मचारी यांच्यातील राजकीय चढाओढीत त्यांच्या प्रभाव पाहता खच्चीकरण करण्याच्या हेतूने मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यामध्ये नमूद केले होते. यापूर्वी नांदुरा बस स्थानकाचा कारभार सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रक म्हणून गायकी यांनी प्रयत्न केले होते. लोकसहभागातून स्थानक परिसर त्यांनी सुशोभित करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
नांदुरा आगाराचे वाहतूक नियंत्रक निलंबित
By admin | Updated: October 7, 2015 23:45 IST