जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:24+5:302021-01-09T04:29:24+5:30

बुलडाणा: राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’मुळे काही पक्ष्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर ८ ...

Measures are being taken against the backdrop of bird flu crisis in the district | जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर उपाययोजना सुरू

जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर उपाययोजना सुरू

Next

बुलडाणा: राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’मुळे काही पक्ष्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर ८ जानेवारीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १४ पथक (आरआरटी) स्थापन करण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रोजच्या आणि आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.

इतर राज्यांमध्ये कावळे, वन्य पक्षी व स्थलांतरी पक्षी यांच्यामध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बर्ड फ्लू’ पार्श्वभूमिवर रोग अन्वेषण विभागाकडून सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने खबरदारीची भूमिका घेत शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक त्या उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. पशुसंवर्धन सहआयुक्तांकडून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला ७ जानेवारी रोजी उशिरा प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ८ जानेवारीला जिल्हा परिषदेकडून प्रत्येक तालुका स्तरावर एक दक्षता पथक नेमण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर आरआरटी पथक (रॅपिड रिस्पॉन्स टेस्ट) स्थापन करण्यात आले आहे. शिवाय पीपीई किटचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही ‘बर्ड फ्लू’मुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला नसला, तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे पशुसंवर्धन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

पक्ष्यांच्या वाहतुकीवर बंदी

बुलडाणा जिल्ह्यातून विदर्भासह मराठवाड्यातही पक्ष्यांची वाहतूक होते; परंतु ‘बर्ड फ्लू’मुळे आता या वाहतुकीला आळा बसणार आहे. संशयीत क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक व ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी रोग नमुने नियमित प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

कोट

‘बर्ड फ्ल्यू’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पशुसंवर्धन आयुक्तांकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. की. मा. ठाकरे, पशुसंवर्धन अधिकारी, बुलडाणा.

कोट

तालुकास्तरावर दक्षता पक्षकांची स्थापना करण्यात आली आहे. पोल्ट्री फार्मसाठी जैवसुरक्षाबाबत सुचना देण्यात येत आहेत. प्रत्येक पोल्ट्री फार्मसनी पक्षांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छता विषयक नियमांचे पालन करावे.

डॉ. तृप्ती पाटील,

पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.

Web Title: Measures are being taken against the backdrop of bird flu crisis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.