साखरखेर्डा (बुलडाणा) : नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना शेंदुर्जन येथे घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध ५ एप्रिल रोजी विविध कलमान्वये साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील तिसगाव हापर्डा येथील किरण हिचा शेंदुर्जन येथील मदन तोताराम चांदणे याच्याशी २0 एप्रिल २0१४ रोजी विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस या नवदाम्पत्याचा संसार सुखाचा झाला; मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी नवे घर बांधण्यासाठी किरणकडे माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. किरण हिने वडिलांचे निधन झाले असून, आईची परिस्थिती हालाखीची असल्याने माहेरहून पैसे देऊ शकत नसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले. त्यामुळे पती व सासरच्या मंडळींनी किरण हिला उपाशी ठेवणे, मारहाण करणे यासारखा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, गर्भवती असलेल्या किरणने हा त्रास सहन केला; परंतु सासरच्या मंडळींकडून किरणचा छळ सुरूच होता. अखेर ५ एप्रिल रोजी तिने साखरखेर्डा पोलिसात पती मदन चांदणे, सासू केसरबाई चांदणे, दीर रामदास चांदणे, जाऊ दुर्गा चांदणे व मावस सासू कौशल्याबाई जोहरे या पाच जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
एक लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: April 6, 2015 02:05 IST