देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज गेल्या काही काळापासून आंदोलने करत असून या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत आहे. समाजाच्या भावनाही तीव्र होत आहे. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे आरक्षण देण्यात कमी पडत असलेल्या सरकारचीच प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत त्याला दहन देण्यात आले. देऊळगाव मही येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला. देऊळगाव मही बसस्थानक परिसरात सर्व समाज बांधव तथा युवावर्ग एकत्र येऊन तेथे समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पार्थिवाची तिरडी बांधण्यात आली. सोबतच देऊळगाव मही शहरातील रस्त्यावरून ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर युवकांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा गावातील स्मशानभूमीमध्ये पोहोचली. तेथे ही युवकांनी शोक करून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रेताचे चक्क स्मशानभूमीतच दहन केले. या आंदोलनामध्ये देऊळगाव मही गावासह पंचक्रोशीतील नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. एक प्रकारे खऱ्या प्रेतयात्रेप्रमाणेच ही राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा आठ आॅगस्ट रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास काढण्यात आली होती. त्यानंतर गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्मशानभूमीत प्रतिकात्मक पार्थिवाचे दहन करण्यात आले. एखाद्या मागणीच्या पुर्ततेसाठी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तिचे चक्क स्मशानभूमीतच दहन करण्याचे अशा प्रकारचे हे कदाचीत एकमेव आंदोलन असावे. या आंदोलनाची सध्या परिसरात चर्चा आहे.
Maratha Reservation : देऊळगाव मही येथे काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:51 IST
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे आरक्षण देण्यात कमी पडत असलेल्या सरकारचीच प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत त्याला दहन देण्यात आले.
Maratha Reservation : देऊळगाव मही येथे काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
ठळक मुद्देआरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पार्थिवाची तिरडी बांधण्यात आली. गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्मशानभूमीत प्रतिकात्मक पार्थिवाचे दहन करण्यात आले. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तिचे चक्क स्मशानभूमीतच दहन करण्याचे अशा प्रकारचे हे कदाचीत एकमेव आंदोलन असावे.