मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा

By सदानंद सिरसाट | Published: December 3, 2023 05:52 PM2023-12-03T17:52:49+5:302023-12-03T17:53:46+5:30

ड्रोन कॅमेऱ्यांची नजर : जिल्हाभरातून मराठा समाजबांधव एकवटणार

manoj jarange patil rally tomorrow in khamgaon malkapur | मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा

मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा

सदानंद सिरसाट, खामगाव, बुलढाणा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील विदर्भ दौऱ्यावर येत असून, त्यांची खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिषद मैदानावर उद्या सोमवार, ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता सभा होणार आहे. सोबतच दुपारी एक वाजता मलकापुरात सभा होत आहे. सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजबांधव झटत आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केल्यापासून त्यांच्या उपोषण, आंदोलनाला मराठा समाजबांधवांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत असून, महाराष्ट्रातील अनेक शहरे, गावांत त्यांच्या सभा होत आहेत. ४ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव व शेगाव असा त्यांचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आले. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. तर सभास्थळी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच विद्युत व्यवस्था, पाणी आदी सुविधांबाबत तयारी झाली आहे. सभास्थळी गेट क्रमांक १ मधून पुरुष, गेट क्रमांक २ मधून महिला / पत्रकार व पोलिस प्रशासन, तर गेट क्रमांक ३ मधून पुरुषांसाठी प्रवेश राहणार आहे. वाहने पार्किंग केल्यानंतर समाजबांधवांनी सभास्थळी पायी यावे, असे आवाहन करण्यात आले.

- सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

सभेसाठी खामगावसह संपूर्ण जिल्हाभरातून सकल मराठा समाजबांधव एकवटणार आहेत. त्यादृष्टीने वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली. यामध्ये राणा लकी सानंदा शाळेजवळ शेगाव रोड, जे. व्ही. मेहता विद्यालय, पोलिस परेड ग्राउंड, जि. प. हायस्कूल मुले व मुलींची शाळा, ओंकारेश्वर मैदानासमोरील मैदान चिखली रोड, कृउबास टीएमसी यार्ड अकोला रोड अशी पार्किंग व्यवस्था आहे.

- जरांगे यांचा शेगावात मुक्काम

खामगाव येथील सभा आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील शेगावकडे रवाना होणार आहेत. शेगाव येथे पोहोचल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शहरात मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.

- आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

सभास्थळी लक्ष देण्यासाठी आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

Web Title: manoj jarange patil rally tomorrow in khamgaon malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.