आदर्श शिक्षक पुरस्काराने संगीता वाघ यांचा सन्मान
बुलडाणा : पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पवार यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये ३७ शिक्षकांचा गौरव करत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शिक्षिका संगीता पंढरीनाथ वाघ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळातही तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांची केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची निवड करण्यात आली.
नुकसानीचा सर्व्हे करून आर्थिक मदत द्या
मोताळा : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये कोथळी येथील गट २६ मधील जवाहर योजनेमधून मिळालेल्या विहिरीचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. कोथळी येथील गट २६, २९ मधील दहा एकर शेतातील सीमा जोहरी, नितीन जोहरी, लीलाबाई जोहरी यांचे मका पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.
जैन पर्युषण पर्वाची उत्साहात सांगता
मेहकर : शहरासह जानेफळ व तालुक्यात जैन पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात आले. मागील ४ सप्टेंबर रोजी जैन पर्युषण पर्व सुरू झाले. या पर्युषण पर्वाची सांगता ११ सप्टेंबर रोजी क्षमापना कार्यक्रमाने करण्यात आली. या दिवसात आठ दिवस उपवास, धार्मिक कार्यक्रम, भक्ती कार्यक्रम तसेच जैन सूत्र पठन व प्रतिक्रमण करून सकल जैन समाज या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो. यावेळी शहरात महावीर गादीया, चंदन जैन यांच्यासह स्वाध्यायी यांनी मार्गदर्शन केले.