हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा): ग्रामपंचायतींना हायटेक करण्यासाठी केंद्र शासनाने ब्रॉडबँड नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन केले आहे. अशातच सेवा सुरू झालेली नसताना ग्रामपंचायतींना बिले आली असल्याने संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्तरावर उमटत आहेत.२१ व्या शतकात वाटचाल करीत असताना विज्ञानाच्या प्रगतीचा एक भाग म्हणून इंटरनेट सुविधांकडे बघितल्या जाते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतींना हायटेक करण्यासाठी ब्रॉडबँड सेवा ग्रामस्तरावर व्हावी यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. मलकापूर तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड’ कनेक्शन बसविण्यात आले आहेत.मागील सात ते आठ महिन्याच्यर्ा काळात मलकापूर तालुक्यात भारत ब्रॉडबँड नेटवर्क अंतर्गत कंत्राटदाराने या सेवेसाठी लागणार्या केबल टाकल्या आहेत. त्यासाठी लागणारे ‘इन्स्टुमेंट’देखील प्रत्येक ग्रामपंचायतीत बसविण्यात आलेले आहेत; मात्र टेस्टिंगच्या नावाखाली सदर सेवा अजूनही कार्यान्वित झालेली नाही. तालुक्यातील ग्रामपंचायतींना या सेवेच्या कार्यान्वीकरणाची प्रतीक्षा आहे. अनेक सरपंचांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.ब्रॉडबँड सेवा अजून सुरू झालेली नाही हे वास्तव आहे. अर्थात यंत्रणा सज्ज आहे; मात्र इंटरनेट कनेक्शन नाही, असे असताना तालुक्यातील वडजी, अनुराबाद, झोडगा, गोराड अशा विविध ग्रामपंचायतींना भारत ब्रॉडबँड नेटवर्क या कंपनीची बिले मात्र आली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींना नाहक भुर्दंड बसणार असून ‘गाव बसा नही और लुटेरे हाजीर’ अशा संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दुरसंचार विभागाने ही सेवा खामगाव केंद्रातून आहे, आमचा काही संबंध नाही, असे सांगून कानावर हात ठेवले आहेत. दुसरीकडे या सेवेच्या तक्रारीसाठी देण्यात आलेला क्रमांक १५0४ हा सतत व्यस्त किंवा नॉट रिचेबल असल्याने या सेवेविषयी संवाद साधावा कुणाशी, हा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपस्थित केल्या जात आहे. तरी संबंधितांनी त्याविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मलकापूर तालुक्यात आम्ही ब्रॉडबँड सेवेच्या केबल व यंत्रे लावण्याची कामे केली आहेत; मात्र अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात कदाचित सुरू होईल, असा आमचा अंदाज आहे.- विजय शर्मा, कंत्राटदारभारत ब्रॉडबँड नेटवर्क लि.
आमच्या ग्रामपंचायतीसाठी ब्रॉडबँड सेवेसाठी लागणार्या केबल व यंत्र बसवून बरेच दिवस झाले आहेत. इंटरनेट कनेक्शन मात्र अजूनही सुरू नाही आणि त्याचे बिल मात्र आले आहे. त्याची चौकशी आम्ही करत आहोत. - गणेश नारखेडे, सरपंच, झोडगा, ता. मलकापूर