महाविकास आघाडीतील नाराजांची मनधरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:21 PM2020-01-15T15:21:40+5:302020-01-15T15:22:05+5:30

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा सत्ता फॉर्म्युला बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीमध्येही बसला

Mahavikas aghdi : Try to appease of Disappointment leader | महाविकास आघाडीतील नाराजांची मनधरणी!

महाविकास आघाडीतील नाराजांची मनधरणी!

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरही महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झालेली नाही. समारंभाच्या उपस्थितीसाठी नाराजांची चांगलीच मनधरणी करावी लागल्याची माहिती समोर येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदग्रहण समारंभापूर्वीही अनेक नाट्यमय घडामोडी दोन दिवसात पाहावयास मिळाल्या. एकंदरीतच समारंभातूनही काही नेत्यांच्या मनातील खदखद समोर आली.
राज्यस्तरावर झालेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा सत्ता फॉर्म्युला बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीमध्येही बसला. परंतू हा फॉर्म्युला फीट करण्यासाठी अनेकांना जीवाचे राण करावे लागले. बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या ६० असून भाजपचे २३, काँग्रेसचे १४, शिवसेनेचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, भारीप-बमसचे दोन असे संख्या बळ आहे. भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने त्यांची संख्या २४ वरून २३ वर आली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे गणित जुळल्याने भाजप सुरूवातीपासून बॅकफुटवर गेले होते. जिल्हा परिषद सदस्य काही दिवसांसाठी सहलीवरही पाठविण्यात आले होते. अध्यक्ष पद घाटावर राहण्यासाठी सुद्धा काहींनी कसून प्रयत्न केले. महाविकास आघाडीचे सत्ता समिकरण जुळल्यानंतरही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अंतर्गत कलह शेवटच्या क्षणापर्यंत पाहावयास मिळाला. उपाध्यक्ष पद शिवसेनेला दिल्याने त्यांच्या हालचाली थंडावल्या. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून नऊ महिला इच्छूक होत्या. प्रत्येकाने आपआपल्या परिने प्रयत्न सुरू केले. मुंबईपर्यंत विषय पोहचला. दरम्यान, मुकूल वासनिक यांनी जादुची कांडी फिरवल्यागत कुणाला काही कळण्याआधीच अध्यक्षपद निश्चित झाले. परंतू या राजकीय घडामोडीमध्ये काँग्रेस कमिटीचे मेहकर तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी सर्वांसोबत राहून केंव्हा आपली पोळी भाजून घेतली, हे समजलेच नसल्याचे आज पदग्रहण समारंभावेळी अनेकांनी बोलून दाखवले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीनंतर अनेक सदस्य नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसला आजपर्यंत प्रयत्न करावे लागले. १३ जानेवारीला शिवसेनेच्या कमल बुधवत यांनी उपाध्यक्ष व १४ जानेवारीला काँग्रेसच्या मनिषा पवार यांनी पदभार स्विकारला. परंतू या पदग्रहण समारंभात काही सदस्य गैरहजर राहिले, तर काही हजर राहूनही मनातील नाराजी लपवू शकले नाही.

शिवसेनेच्या काही सदस्यांना निमंत्रणच नाही!
शिवसेनेच्या काही सदस्यांना अध्यक्ष पदग्रहण समारंभाचे निमंत्रणच नसल्याने त्यांनी समारंभाला हजेरी लावली नाही. शिवसेनेतही एकछत्री कार्यक्रमाचा प्रभाव असून जि. प. सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसचा वेगळा गट पडण्याचे संकेत?
जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे एकूण १४ सदस्यांपैकी नऊ महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या. परंतू वरिष्ठांच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार? असे म्हणून इतर सदस्यांना शांत बसावे लागले. काँग्रेसचे सदस्य व इतर नेतेमंडळींच्या मनात असलेली नाराजी समारंभातून दिसून आली. काँग्रेसमधील नेत्यांची नाराजी ओळखून समारंभाचे निमंत्रण अध्यक्षांमार्फत प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. समारंभ सुरू होण्यापर्यंत नाराजविरांना फोनकरून त्यांची मनधरणी करावी लागली. या निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसचा वेगळा गट पडण्याचे संकेतही एका सदस्याने दिले.

Web Title: Mahavikas aghdi : Try to appease of Disappointment leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.