मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या संकल्पनेतून ‘टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू’ असलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्सपासून ‘आय लव्ह लोणार’ हे सेल्फी पॉइंट तयार केल्याने लोणार पर्यटन नगरीची सुंदरता वाढीस लागली आहे. लोणार शहरातील नवविवाहित, तरुण-तरुणी, लहान मुले, रात्रीच्या वेळेस या सेल्फी पॉइंटचा आनंद घेत आहेत. ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही खाऱ्या पाण्याचे सरोवर पाहणी दौऱ्यादरम्यान सेल्फी घेण्याचा मोह आवरला नव्हता. त्यांनी खासदार प्रतापराव जाधव, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत सरोवराच्या काठावर बाजूला उभे राहून सेल्फी घेण्याचा आनंद घेतला होता.
स्थानिक नागरिकांच्या मनात आपल्या शहराप्रति विकासाची, स्वच्छतेची चांगली प्रतिमा निर्माण होऊन एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्यासाठी येथे हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक जण आता या लोणारच्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेताना दिसून येतो.