- मनोज पाटीलमलकापूर : विविध मागण्यांसाठी धुपेश्वर येथे पुर्णा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोळी महादेव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी मलकापूर पोलीसांनी ताब्यात घेतले. कोळी महादेव समाजाला आरक्षणापासून वंचीत ठेवल्या जात आहे. विविध मागण्यांसाठी याआधी लोकशाही मार्गाने सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अन्यायाला कंटाळून कोळी महादेव संघर्ष समितीच्या १० पदाधिकाºयांनी बुधवारी दुपारी धुपेश्वर येथे पुर्णा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी वेळीच हा प्रयत्न अयशस्वी करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीवर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे. त्यांना आरक्षणापासून वंचीत ठेवल्या जात आहे. या अन्यायाला कंटाळून चिखली तालुक्यातील भानखेड येथील महादू वाघ या युवकाने आत्मबलिदानही दिले. महादु वाघ यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी कोळी महादेव संघर्ष समितीच्यावतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येत आहे. याआधी धुपेश्वर येथे पुर्णा नदीपात्रात तब्बल पाच दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. मात्र हे आंदोलन पोलीस प्रशासनाच्यावतीने दडपण्यात आले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाºयांवर सात दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरितीने देण्यात यावे यासह विविध मागण्या कोळी महादेव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागण्या पुर्ण होण्यासाठी जलसमाधी घेण्याचा इशारा समितीच्या वतीने विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदनाव्दारे देण्यात आला होता.त्यानुसार बुधवारी कोळी महादेव संघर्ष समितीचे निलेश जाधव, पुरूषोत्तम झाल्टे, गजानन धाडे, भास्कर सोनोने, भरत झाल्टे, गंगाधर तायडे, रामचंद्र गवळी, कैलास सुरळकर, सुरेश झाल्टे व राम सुरडकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दुपारी धुपेश्वर येथील पुर्णा नदीपात्रात उड्या घेवून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस प्रशासनासोबत तैनात असलेल्या विशेष टीम कडून या आंदोलनकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले.
कोळी महादेव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा ‘जलसमाधी’ चा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:00 IST