रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:04 AM2020-06-10T11:04:26+5:302020-06-10T11:05:05+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.

Khamgaon taluka trailing in ration grain distribution! | रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला!

रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला!

Next

- अनिल गवई 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.
बुलडाणा जिल्ह्यात ४ लक्ष ८३ हजार ४८७ कार्डधारक आहेत. यापैकी जिल्ह्यातील ४ लक्ष ६३ हजार ९५२ कार्ड धारकांना जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात धान्य वितरीत करण्यात आले.
जिल्ह्यातील धान्य वितरणाची सरासरी टक्केवारी ही ९६ टक्के इतकी आहे. यामध्ये जळगाव जामोद (९७.४), संग्रामपूर (९७.२) आणि बुलडाणा (९७.१) तालुक्याने धान्य वितरणात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.  खामगाव तालुक्यात ४५ हजार ५८१ कार्ड धारक आहेत.
या पैकी ४२ हजार ०८६ कार्ड धारकांनाच धान्य वितरीत करण्यात आले. म्हणजेच खामगाव तालुक्यात ९२.०३ टक्के धान्य वितरण करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यात धान्य वितरणाची ही टक्केवारी सर्वात कमी असल्याचे समोर येत आहे.

खामगाव पेक्षा शेगावची टक्केवारी जास्त!
खामगाव येथील पुरवठा अधिक्षक व्ही. एम.भगत यांच्याकडेच शेगाव तालुक्याचा प्रभार आहे.  कोरोना संचारबंदी काळात  खामगावपेक्षा शेगाव तालुक्याची धान्य वितरणाची टक्केवारी खामगाव तालुक्यापेक्षा जास्त आहे. गत तीन महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असल्याने खामगाव तालुक्यातील अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहे. दरम्यान, शेगावचा प्रभार असतानाही या तालुक्यातील धान्य वितरण जास्त आणि खामगावातील अधिकारी असतानाही खामगाव तालुक्याचे वितरण कमी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आदिवासी तालुक्यात समाधानकारक वितरण!
 आदिवासी तालुके म्हणून ओळख असलेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात धान्य वितरणाची टक्केवारी सरासरी ९७ टक्क्के आहे. सर्वात मोठ्या खामगाव तालुक्यातील टक्केवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे.


जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत खामगाव तालुक्याचा व्याप मोठा आहे. येथील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. धान्य वितरण सुरळीत करण्यातसाठी प्रयत्न केले जात आहेत.
-व्ही.एम. भगत
पुरवठा अधिक्षक, खामगाव.

 

 

Web Title: Khamgaon taluka trailing in ration grain distribution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.