लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा/शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चार गावांतील केस गळतीची लागण ही आता जवळपास ११ गावांत पोहोचली आहे. दरम्यान, त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने हे नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची ॲन्टी फंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केस गळतीचे हे लोण बोंडगावसह कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहुरजिरा, निंबी, तरोडा कसबा या गावात पोहोचले असून, केस गळती होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. ६ जानेवारीपासून केस गळतीचे रुग्ण शेगाव तालुक्यातील या गावांमध्ये आढळून येत आहेत. भोनगाव, जवळा बुद्रुक या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रामुख्याने ही गावे येतात.
किती गावांत लागण?
- गोंडगाव १९
- कालवड १५
- कटोरा ०८
- भोनगाव ०४
- मच्छिंद्र खेड ०५
- हिंगणा ०५
- भुई ०८
- तरोडा कसबा १०
- पहुर्जिरा बारा
- माटरगाव बु ०८
- निंबी ०५
नायट्रेटचे प्रमाण अधिक
तपासणीसाठी घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण हे तब्बल ५४.०८ पीपीएम आणि टीडीएसचे (क्षार) प्रमाण २११० पीपीएम आढळून आले आहे. हे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप आहे. क्षाराचे प्रमाण हे ११० च्या आसपास असायला हवे ते ही खूप अधिक आहे. त्यामुळे या भागातील पाणी हे घातक असल्याचे समोर येत आहे.