खामगाव : इलेक्ट्रॉनिक वजन-काटे खरेदीत घोटाळा झाल्याच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात येथील कृउबास उपसभापती व संचालकांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. इलेक्ट्रॉनिक वजन-काटे खरेदीत घोटाळा केल्याच्या सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कृउबास सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दीपके, सचिव दिलीप देशमुख, संचालक प्रमोद चिंचोलकर, विलाससिंग इंगळे व कंत्राटदार अशा सहा जणांविरुद्ध ६ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. सभापती संतोष टाले व सचिव दिलीप देशमुख यांना ६ मे रोजी अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. दरम्यान, पोलीस कोठडी संपल्यानंतर ११ मे रोजी न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही २५ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यात आला असता इतर अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. कृउबास उपसभापती नीलेश दीपके, संचालक प्रमोद चिंचोलकार व विलाससिंग इंगळे यांनी न्यायालयात अर्ज केला असता १९ मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
कृउबास उपसभापती, संचालकांना अंतरिम जामीन
By admin | Updated: May 13, 2017 04:49 IST