किराणा दुकानदार हे नेहमीच कोरोना वाहकाच्या संपर्कात असू शकतात याचे भान ठेवून, आवश्यक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्व किराणा दुकानदार करीत आहेत. आवश्यक सेवा सुरू ठेवून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी कामाचे व वेळेचे नियोजन करावे लागत आहे. त्यासाठी त्यांचे वेळोवेळी नवीन आदेश निघतात. हे सर्व बदल दुकानदारांना माहीत असणे आवश्यक असते. बऱ्याचदा बदललेल्या नियमांची माहिती न पोहोचल्यामुळे अनेक दुकानदारांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
किराणा व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून हे बदल सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनासमोर ठेवण्याचे काम किराणा असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे. या दिवसांत शहरात अनेक नवीन किराणा दुकाने उघडली आहेत. त्या सर्व दुकानदारांचा व आधीच्या दुकानदारांचा संघटनेच्या सदस्यत्वामध्ये समावेश करण्यात येत आहे, अशी माहिती किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अमरचंद कोठारी, सुनील चावला, मुकेश नैनाणी यांनी दिली आहे.