बुलढाणा : कॅनडातील विनिपेग येथे १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान होत असलेल्या जागतिक धनुर्विद्या युवक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा सुवर्णयश संपादन करत तिरंदाजीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. भारतीय प्रमाणवेळेनुसार २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता, तर कॅनडातील स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जर्मनीवर टाय शॉटमध्ये थरारक विजय मिळवला.
कंपाउंड प्रकारातील या अंतिम सामन्यात भारत व जर्मनी यांच्यात २३३-२३३ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सामना निर्णायक टप्प्यात पोहोचला. टाय शॉटमध्ये भारताच्या नेमबाजांनी अचूक लक्ष्य गाठत डॉट एक्स मारला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर पक्के केले. या निर्णायक क्षणी बुलढाण्याचा मिहीर नितीन अपार याने जबरदस्त नेम साधत भारताला सुवर्ण जिंकवून दिले. त्याच्या अचूकतेमुळे सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले गेले.
भारतीय संघात मिहीर नितीन अपार (बुलढाणा), कुशल दलाल (हरयाणा) आणि गणेश मणिरत्नम (आंध्रप्रदेश) यांचा समावेश होता. मिहीरने संघाचे नेतृत्व करत सुवर्णयशाची पताका फडकावली. यापूर्वीही पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्ण, तर जूनमध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्य पटकावले होते. मिहीर नितीन अपार हा गेल्या १२ वर्षांपासून बुलढाणा येथे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. आपल्या या यशाचे श्रेय तो आई-वडील, आजी-आजोबा व प्रशिक्षकांना देतो. बुलढाण्याचा हा युवा नेमबाज आज जागतिक पातळीवर ‘गोल्डन बॉय’ म्हणून नावारूपास येत आहे.