खामगाव : सतत चौथ्या दिवशीही जिल्ह्यावर गारपीट व अवकाळी पावसाचे संकट कायमच आहे. मंगळवारी रात्री घाटावरील तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले, तर बुधवारी दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारा कोसळल्या. सतत तीन वर्षांपासून संकटात सापडलेल्या शेतकर्याला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगामही पूर्णपणे बाधित झाला आहे. जवळच असलेल्या निपाणा येथील कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बांधलेले किचनशेड २ मार्च रोजी परिसरात झालेल्या वादळी वार्यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या साहित्यांचे नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांवर शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जी.जे. गवई यांनी झालेल्या नुकसानासंदर्भात सरपंचपती दिलीप राणे, पोलीस पाटील गजानन झनके, नामदेव चौधरी, रमेश भोटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कानावर माहिती देऊन झालेल्या नुकसानासंदर्भात पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीचे गहू, कांदा, कांदा बियाणे या पिकांसोबतच संत्रा, मोसंबी, लिंबू अशा फळबागांना सुद्धा फटका बसत आहे. २ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील चिंचपूर परिसरात दुपारी २.३0 ते ३.३0 असा एक तास अवकाळी पाऊस बरसला. सोबतच अर्धातास हरभर्याच्या आकाराएवढी गारपीट झाली. या गारपिटीमुळे चिंचपूर येथील कैलास निर्मळ यांचे कांदा बियाणे, ज्ञानेश्वर कदम, तुकाराम शेळके, आत्माराम कदम, विजय शेळके, श्रीधर देशमुख यांच्या संत्राबागेचे नुकसान झाले. तर गोविंदराव देशमुख यांच्या गहू पिकाचे पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. हा अवकाळी पाऊस व गारपीट परिसरातील पिंप्री कोरडे, तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा, किन्ही नाईक परिसरातही झाली. एकूणच शेतीपिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका सुरुच असून, कोरडवाहू हंगामासोबत रब्बी पिकांची नासाडीसुद्धा नैसर्गिक चक्र बदलत असल्याने होत आहे.
गारपिटीचे संकट कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:17 IST