बुलढाणा - समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी नवी मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले. ४ कोटी ६० लाख रुपयांचा पावणेपाच किलो सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दोन कार जप्त केल्या आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू असून, ते राजस्थानमधील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
दरम्यान, एका आरोपीस अटक करीत दोन कारही जप्त केल्याचे मेहकरचे एसडीपीअेा प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. नवी मुंबईतील व्यापारी अनिल शेशमलजी चौधरी (वय ५५, रा. सी-वूड रेसिडेन्सी) हे खामगाव येथून सोन्याचा ऐवज घेऊन या त्यांच्या कारमधून निघाले होते.