अशोक इंगळे
साखरखेर्डा
गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पेट्रोल, डिझेलचे दररोज वाढत चाललेले दर आणि शेत मालाला बाजारपेठत कमी होत असलेला भाव या संपूर्ण अर्थचक्रात सर्वसामान्य भरडला जात आहे. याची दखल केंद्र सरकारने घेऊन वाढत्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
गरिबापासून श्रीमंत व्यक्तीच्या गरजा लक्षात घेता आजची दरवाढ ही सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसली आहे. २०० रुपये रोजंदारीवर काम करून घरखर्च चालविणे आजच्या महागाईच्या काळात कठीण झाले आहे. किरकोळ विक्रेते खेड्यापाड्यांत जाऊन पाचशे, हजाराचा माल विकतात. त्या मालाची विक्री झाली तर शे-दोनशे नफा मिळतो. कधीकधी मालाची विक्री झाली नाही, तर उपाशीपोटी दिवस काढावा लागतो. कोरोना काळात शेकडो किरकोळ व्यापारी घरीच बसून होते. लवकर चूलही पेटत नव्हती. तरीही पोटाला चिमटा घेऊन घरातली होती नव्हती पुंजी कुटुंबातील सदस्यांची खळगी भरण्यासाठी वापरली. विजेचे वाढते दर, वीज वितरण कंपनीची पठाणी वसुली यातही सामान्य माणसाला दिलासा मिळाला नाही. गॅस सिलिंडर स्वस्त होणार ही घोषणा भाजप शासनाने केली होती. परंतु ही गॅस सिलिंडर दरवाढ पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. १० रु. लीटर प्रमाणे राॅकेल मिळत होते. शासनाने राॅकेल बंद केल्याने ते मिळणे दुरपास्त झाले आहे. महिलांना स्वयंपाकघरात पुन्हा चुली पेटवाव्या लागत आहेत. तेल, साखर, मीठ यांसह अनेक आवश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस अशीच महागाई वाढत गेली तर गरिबीचा आलेख चढता राहील, याची भीती सर्वसामान्य माणसाला सतावत आहे.
-------------------------------------------_-----------------
गॅस सिलिंडर दरवाढ ही गरिबांच्या मानगुटीवर बसलेली मोठी समस्या असून गॅस दर हे सर्वसामान्य माणसाला परवडतील असेच हवेत.
रेणुकाबाई मंडळकर, गृहिणी
साखरखेर्डा.