अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): शहरातील ज्वेलर्सकडून दागिने खरेदीच्या व्यवहारात तब्बल १ कोटी ६२ लाख ४४ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, रिशी संदीप खत्री (२४, रा. रायगड कॉलनी, खामगाव) याने फिर्यादी जितेंद्र मुरलीधर सोनी ( ५५, रा. मेन रोड, खामगाव) तसेच व्यापारी अभिषेक महेश शेलार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले. फिर्यादीच्या फर्मकडून १ कोटी ३७ लाख ४० हजार ५५७ रुपये आणि शेलार यांच्या फर्मकडून २५ लाख ४ हजार ३८२ रुपये किमतीचे दागिने आरोपीने घेतले. मात्र त्याबदल्यात दिलेले धनादेश अपुरे ठरल्याचे तक्रारीत नमूद केले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
व्यापारी वर्तुळात खळबळ
या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून, अशा प्रकारची फसवणूक झाल्याची शंका असल्यास संबंधितांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.