बुलडाणा जिल्ह्यात प्रारंभी सहा केंद्रांवरच लस देण्यात येत होती. त्यानंतर ही सुविधा आणखी चार केंद्रांवर वाढविण्यात आली. विभागात अमरावती जिल्हा लसीकरण मोहिमेत पहिल्या स्थानावर असून अकोला जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. वाशिममध्येही ७६ टक्के लसीकरण झाल्याने हा जिल्हा तिसऱ्या स्थानावर असून, बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के लसीकरण झाले असून, जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे मोठे असल्याने तुलनेने लसीकरणाचा वेग काहीसा मंद असल्याचे चित्र आहे.
खासगी वैद्यकीय क्षेत्रातून प्रतिसाद कमी
जिल्ह्यात खासगी वैद्यकीय क्षेत्रातून लसीकरणाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्याच्या वेळीही खासगी क्षेत्रातून नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचेच प्रत्यंतर प्रत्यक्ष लसीकरणातही दिसत असून प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र आहे. कायमस्वरूपी तथा कंत्राटी तत्त्वावर कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात १९ हजार डोस
पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला १९ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यातून १४,४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हे लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठीचे डोस उपलब्ध होणार आहेत. सोमवारी त्याबाबत नेमके चित्र स्पष्ट होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी ‘लोकमत’शी सांगितले. सोमवारी फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू होईल. नव्याने काही जणांची नोंदणी झाली आहे. त्यांना ही लस दिली जाईल. शीतकरण साखळीही योग्य पद्धतीने ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाची लस सुरक्षित असून लसीकरणास कोणीही घाबरू नये. यासंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.