बुलडाणा : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यापासून तालुकास्तरासह जिल्हा परिषदेची १४ पथके अलर्ट झाली आहेत. बर्ड फ्लू आढळलेल्या एक कि.मी.च्या परिघातील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेत जिल्ह्यातील साडेचार हजार पक्ष्यांचा आतापर्यंत बळी देण्यात आला आहे. कोरोनाने सर्व जग हादरले आहेत. त्यात आता पक्ष्यांवर आलेल्या बर्ड फ्लूने अधिकच भीती वाढविली आहे. चिखली तालुक्यातील भानखेड येथे २०० पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर मादणी येथेही काही बदकांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यापासून पशुसंवर्धन विभागाचे काम वाढले आहे. राज्यात आतापर्यंत कोंबड्या, बगळे, आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. बर्ड फ्लू आढळून आलेल्या त्या मृत पक्ष्यांच्या परिघातील एक किलोमीटर अंतरावरील पक्षांचीही शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. भानखेड परिसरातील मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून या परिसरातील पक्षांचीही विल्हेवाट लावण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार ५०० पक्षांना शास्त्रीय पद्धतीने मारून टाकण्यात आले आहे. त्यामुळे पोल्ट्री फाम चालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
दोन अहवालांची प्रतीक्षा
मेहकर तालुक्यातील मादणी येथेही मागील आठवड्यात बदकांचा मृत्यू झाला होता. त्याचे तपासणी करून अकोला येथे सॅम्पल पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आतापर्यंत आला नाही. त्यामुळे मेहकर तालुक्यातील पोल्ट्री फार्म चालकांसह परिसरातील नागरिकांनाही या अहवालाची प्रतीक्षा आहे.
स्थलांतरित पक्ष्यांपासून धोका कायम?
बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये, यासाठी बर्ड फ्लू आढळून आलेल्या एक कि.मी.च्या परिसरातील पक्ष्यांना मारून टाकण्यात येत आहे. परंतु, यामध्ये कोंबड्यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. यामध्ये अनेक स्थलांतरित पक्ष्यांपासून धोका वाढू शकतो. परंतु, स्थलांतरित पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेली दिसून येत नाही.
पाटबंधारे विभाग, वन विभागाचेही लक्ष
पाटबंधारे विभाग आणि वन विभागाला पाणवठे, जलाशय परिसरात मृत पक्षी आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने पशु संवर्धन विभागाला देण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभाग आणि वन विभागानेही पाणवठ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
बर्ड फ्लू आढळून आलेल्या एक कि.मी. परिसरातील चार हजार ५०० पक्ष्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मादणी येथील पक्ष्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
पी. जी. बोरकर, जिल्हा पशु उपायुक्त.