शेगाव (जि. बुलढाणा) : शेगाव तालुक्यातील बोंडगावसह लगतच्या ११ गावांमध्ये केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. टक्कल पडल्याचे आणखी २७ रुग्ण आढळून आले आहेत. आता या रुग्णांची संख्या १२७ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गावातील इतरांनी त्याची धास्ती घेत आता दैनंदिन स्वच्छतेसाठी अंघोळ करणेही बंद केल्याचा प्रकार घडत आहे.
बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा, माटरगाव या गावातील लोक केसगळतीच्या समस्येने ग्रस्त आहेत. रुग्णांची तपासणी करून त्वचा व रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. त्याचवेळी पाण्याचा वापर अंघोळीसाठी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यामुळे गत आठवडाभरापासून बाधित गावांमधील अनेक नागरिकांनी अंघोळच केली नसल्याची बाब समोर आली आहे.
शास्त्रज्ञ येणारकेस गळती आजाराच्या निदान व संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे शास्त्रज्ञ दाखल होणार आहेत. लवकरच या आजाराचे निदान करून योग्य उपचार केले जातील. घाबरू नका, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.