मेहकर: खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. येणार्या खरीप हंगामासाठी खत व बियाण्याकरीाता पै पै जुळविण्यास शेतकरी मेटाकुटीस येत आहे. शेतकर्यांना बँकेकडूनही पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकर्यांना सावकारांची उंबरठे झिजवावी लागत आहेत. गतवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अतवृष्टीने कहर केला होता. त्यानंतर रब्बी पीक चांगले बहरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने मदतीचा हात दाखविला परंतु त्यातूनही अनेक शेतकरी वंचित राहिले. आता पुन्हा खरीप हंगाम तोंडावर आला असून, त्यासाठी लागणार्या खत व बी बियाण्याच्या तयारीला शेतकरी इकडे तिकडे फिरतांना दिसत आहे. बँकांकडूनही शेतकर्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. तर शेतकर्यांचे बँकेत खाते असलेल्या शेतकर्यांनाही बँकेकडून पीक कर्जासाठी केवळ समोरचीच तारीख दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आता सावकारांच्या पायर्या झिजविण्यास सुरुवात केली आहे. सावकारही व्याजाची रक्कम अधिक दाखवत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खत, बियाण्यांसाठी शेतकर्यांची परवड
By admin | Updated: May 26, 2014 00:20 IST