बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 02:04 PM2019-07-28T14:04:03+5:302019-07-28T14:04:52+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांमध्ये २२ ते २६ जुलै दरम्यान केलेल्या किटकशास्त्रीय सर्व्हेक्षणादरम्यान ८ हजार ९७७ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या.

 Entomological Survey in Buldana District; Nine thousand larvae of mosquitoes were found in nine houses | बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या

बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांमध्ये २२ ते २६ जुलै दरम्यान केलेल्या किटकशास्त्रीय सर्व्हेक्षणादरम्यान ८ हजार ९७७ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. मोहिमेदरम्यान १ लाख ७१ हजार ५६५ भांडे तपासण्यात आली. त्यापैकी ११ हजार ९४१ भांड्यांमध्ये डास अळी आढळली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ६ हजार ६७० भांडी रिकामी केल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. बी. चव्हाण यांनी दिली.
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. डास अळी सर्व्हेक्षण करुन जनजागृती केली जात आहे. सर्व्हेक्षणासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन जणांचा समावेश आहे.
जून ते आॅक्टोंबर हा किटकजन्य रोगांसाठी पारेषण कालावधी असतो. या काळात सर्वच किटकजन्य रोगांचा प्रसार होत असतो. डेंग्यू सारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी डेंग्यू रुग्णांमध्ये तुलनात्मक वाढ दिसून आली होती. डेंग्यू आजारावर प्रभावी व निश्चित औषधोपचार नाही. डेंग्यू नियंत्रणासाठी ताप सर्व्हेक्षण, किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, कोरडा दिवस पाळणे, नागरिकांना शिक्षण देणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागांमध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यू संवेदनशिल शहरात जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जुलैमध्ये २२ ते २७, आॅगस्टमध्ये १९ ते २४ तर सप्टेंबरमध्ये १६ ते २१ दरम्यान सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
डेंग्यू संवेदनशिल शहरांमध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूरचा समावेश आहे. बुलडाणा येथे २२ , चिखली २१, मेहकर १८, खामगाव २९, शेगाव २७ व मलकापुरात ३० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन हे कर्मचारी नागरिकांना डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. आरोग्य सेवक, नगर पालिका कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकांच्या मदतीने हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवावी, घर व परिसरात डोसोत्पत्तीस्थाने असल्यास नष्ट करावी, आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील सर्व पाणी साठे कोरडे करुन ठेवावे. पाणी साठे घट्ट झाकून ठेवावे, उन्हाळ्यात वापरलेले कुलर स्वच्छ करुन कोरडे करावे, भंगार सामान, तुटलेली खेळणी, टायर्स, फुटलेल्या बादल्या, जुनी माठ, राजणे नष्ट करावी, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, लहान मुलांना अंगभर कपडे घाला, खिडक्यांना डासरोधक जाळी बसवा, परिसरातील डबकी बुजवावी, किंवा गप्पी मासे सोडावी, ताप आल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सहा शहरातील घरोघरी जाऊन ५ हजार २१५ भांड्यामध्ये टेमिफॉस टाकण्यात आले आहे. बुलडाणा येथे ७०३, चिखली ९७९, मेहकर १ हजार ५९४, खामगाव १ हजार २५७, शेगाव ३६२, मलकापूरमध्ये ३२० भांडयात टेमिफॉस टाकले. (प्रतिनिधी)

७१ हजार ४८९ घरे तपासली
डेंग्यू मुक्तीसाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकरिता मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत २२ ते २६ जुलै दरम्यान ७१ हजार ४८९ घरे तपासण्यात आली. बुलडाण्यात ११ हजार ८८४, चिखली ११ हजार ११०, मेहकर ९ हजार १५, खामगाव १४ हजार ४६५, शेगाव १३ हजार २८५ व मलकापूरमधील ११ हजार ७३० घरे तपासण्यात आली.
गप्पी मासे सोडली
आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी बुलडाणा शहरातील २६ ठिकाणी गप्पी मासे सोडली. मोठी डबके, नाली, टाके, विहिर व इतर ठिकाणी ही गप्पी मासे सोडण्यात आली. डेंग्यू प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Web Title:  Entomological Survey in Buldana District; Nine thousand larvae of mosquitoes were found in nine houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.