ब्रम्हानंद जाधव/मेहकर: शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा, विद्यार्थी, शिक्षक आदी माहिती एकत्रित करण्याकरिता सरल डाटाबेस योजना सुरू केली आहे. 'सरल'चे काम पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टची डेडलाइन असून, राज्यभरातील हजारो शिक्षक डाटा एन्ट्रीच्या कामात व्यस्त आहेत; परिणामी अध्यापनाचा खेळखंडोबा होत आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व शाळांमध्ये सरल डाटाबेस योजना सुरू केली आहे. यामध्ये सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती संकलित करुन एका सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन भरावी लागत आहे. ही जबाबदारी शिक्षण विभागाने शाळेवर व संबंधित वर्ग शिक्षकावर सोपविली असून संपूर्ण महिती शाळेतच भरण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे शिक्षकांचा वर्गावर शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांची महिती गोळा करण्यातच वेळ जात आहे. काही विद्यार्थ्यांंकडून आधारकार्ड, रक्तगट, बँकखाते आदी माहिती आवश्यक माहीती वेळेवर मिळत नसल्याने या विद्याथ्यार्ंचे अर्ज तसेच पडून आहेत. आतापर्यंत राज्यातील जवळपास २७ ते २८ हजार शाळांची माहिती अपडेट झालेली आहे. ऑनलाईन माहिती भरताना सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट कनेक्ट न होणे आदी अडचणी उद्भवत असल्याने राज्यभरातील जवळपास ७0 टक्के शाळांची माहिती अपडेट करण्याचे काम बाकी आहे. शिक्षण विभागाने सरल डाटाबेसचे काम पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टची डेडलाईन दिल्यामुळे मुख्यध्यापकांसह शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान सरल डाटाबेसचे काम पूर्ण करण्यासाठी केवळ सहा दिवस उरले असल्याने शिक्षक व मुख्याध्यापक दिवसभर संगणकावर बसलेले आहेत. शिक्षक अध्यापनाचे काम सोडून दिवसभर या कामात व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षनिक नुकसान होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!
By admin | Updated: August 10, 2015 00:52 IST