खामगाव : नगर परिषद खामगावचे उपाध्यक्ष वैभव डवरे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या न्यायालयात खामगावचे तत्कालीन नगराध्यक्ष गणेश माने यांच्या विरोधात २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियमाचे कलम ३ (१) (ब) अन्वये याचिका दाखल केली आहे. याचिकेची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सदस्य नगरपालिका खामगाव या पदावर प्रभाग क्र.६ (अ) मध्ये निवडून आलेले गणेश माने यांनी त्यांच्या इतर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीची तत्कालीन जिल्हाध्यक्ष सोपान साठे यांच्यासोबत २१ नोव्हेंबर ११ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केली. या आघाडीमध्ये गणेश माने, नीता बोबडे, वैभव डवरे हे होते व गटनेते म्हणून गणेश माने यांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे गटनेते असताना त्यांनी भाजप-शिवसेना- भारिपबमसं यांच्यासह खामगाव विकास आघाडीची नोंदणी लगेचच २३ डिसेंबर २0११ रोजी केली. त्यामुळे गणेश माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियमचे कलम ३ (१) (ब) चा भंग केला, या आशयाची याचिका वैभव डवरे, उपाध्यक्ष नगर परिषद यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी उपाध्यक्ष वैभव डवरे यांची बाजू अँड.संतोष रहाटे अकोला, अँड.वीरेंद्र झाडोकार, खामगाव हे पाहत असून, खामगावकरांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष गणेश माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
खामगावच्या माजी नगराध्यक्षांविरुद्ध अपात्रता याचिका
By admin | Updated: January 31, 2015 00:51 IST