बोरव्हा येथील घटना, मागील वर्षी झाला होता विवाह
मानोरा : तालुक्यातील बोरव्हा येथील पती-पत्नी शेतात काम करीत असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन या दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार बोरव्हा येथील शेतकरी बाळू रामप्रसाद राठोड (वय २५) व त्यांची पत्नी सुवर्णा राठोड (वय २०) त्यांच्या स्वत:च्या शेतात कामासाठी गेले होते. यावेळी सुवर्णा राठोड हिचा विद्युत तारेला स्पर्श झाला. ती खाली पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या बाळू राठोड याला देखील विद्युत तारेचा धक्का बसला. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बाळू व सुवर्णा यांचा मागील वर्षी विवाह झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली. रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त नव्हती.