बुलडणा : विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवणीस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये १८ एप्रिल राेजी राडा झाला हाेता़ या प्रकरणी बुलडाणा पाेलिसांनी माजी आमदार विजयराज शिंदे, आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यासह दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना भाजप राजकारण करीत असल्याची टीका करीत आमदार संजय गायकवाड यांनी काेराेनाचा जंतू जर मिळाला असता तर देवेंद्र फडणवीस यांच्या ताेंडात टाकला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केले हाेते़ या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी १८ एप्रिल राेजी भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे व कार्यकर्ते जयस्तंभ चाैकात एकत्र आले हाेते़ यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले हाेते़ दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाेटालाेटी केली हाेती़ यामध्ये माजी आमदार विजयराज शिंदे जखमी झाले हाेते़ या प्रकरणी दाेन्ही पक्षांनी परस्परविराेधी तक्रारी दिल्या आहेत़ त्यावरून पाेलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़
माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यासह १७ जणांविरुद्ध भादंवि कलम ३२४, २९४, १४७, १४८, नुसार गुन्हा दाखल केला आहे़ तसेच श्रीकृष्ण आनंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह ८ जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे़ हे.काॅ. रमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पीएसआय अमित जाधव यांच्या फिर्यादीवरून मुन्ना बेंडवाल यांच्यासह २१ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़
संजय कुटे यांच्या गाडीवर हल्ला
शिवसेना-भाजप राड्यावरून बुलडाण्यात राजकारण तापले आहे़ विविध मागण्यांचे निवेदन देण्यास आलेल्या आमदार संजय कुटे यांच्या वाहनावर काही युवकांनी हल्ला केला़ त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर रस्त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध घाेषणा दिल्या़ यावेळी आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह कायर्यकर्ते उपस्थित हाेते़
पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त
भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर पाेलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालय परिसरात पाेलीस बंदाेबस्त वाढवला आहे़ तसेच जयस्तंभ चाैक परिसरातील साेमवारी दुपारी छावणीचे स्वरूप आले हाेते़ अतिरिक्त पाेलीस अधीक्षक बजरंग बन्साेडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी बरकते, ठाणेदार साळुंके, पीएसआय अमित जाधव यांच्या शीघ्र कृती दलाचे जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते़