नांदेड भागातील तीन पुरुष आणि दोन महिला गेल्या अनेक दिवसांपासून विना स्वयंरोजगार नही उद्धार या टॅग लाईन खालप जनसेवा लघु उद्योग विकास महाराष्ट्र असा मजकूर असलेले नोंदणी फॉर्म घेवून गाव, वस्ती, वाडीवर जाऊन तेथील अशिक्षित महिलांना गंडा घालण्याचे काम करीत होते. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात या टोळीने अनेक महिलांचे फार्म भरून त्यांचेकडून प्रत्येकी दोनशे रुपये उकळे आहेत. दोनशे रुपये घेवून ही टोळी रीतसर पावती देत असे पण या पावत्या आणि नोंदणी फार्म बनावट असल्याचे या टोळीने कबुल केले आहे. या टोळीचा उलगडा एका नाट्यपूर्ण घडामोडी नंतर झाला आहे. बीड येथील शिव क्रांती युवा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश बजगुडे यांच्याच नातेवाईकांना या टोळीने पावत्या दिल्या होत्या. बजगूडे यांनी घनसावंगी मधील आपल्या नातेवाईकांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ही टोळी सिंदखेडराजा तालुक्यातील वसंत नगर भागात गंडा घालण्याचे काम करीत होते. बजगुडे यांनी बुधवारी या भागात येवुन माहिती घेतली व शुक्रवारी सकाळी वसंत नगरमधे या टोळीला गाठले. याबाबत त्यांनी सिंदखेडराजा पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी या पाचही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान,पोलिसांनी या पाचही जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. पोलिसांनी आरोेपींकडून वाहनही (क्रमांक एम.एच.१४. बी.एक्स.५६८६) ताब्यात घेतले आहे.
पोषण आहाराच्या नावावर चालत होता गोरखधंदा
अंगणवाडी व गर्भवती महिलांना जो पोषण आहार पुरविला जातो त्या आहाराचे पॅकिंग करण्याचे काम ग्रामीण महिलांना देण्याचा बनाव करून या टोळीने महिलांसाठी नोंदणी फॉर्म व पावती बुक छापून घेतले होते. या फॉर्मवर जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र) असे छापून त्यावर संस्थेचा लोगो भारताच्या तीन सिंहांची मुद्रा छापली आहे. विभागीय कार्यालय वाळूज, पंढरपूर, एमआयडीसी औरंगाबाद असे असून पोस्टल ऑफिस कामगार चौक, औरंगाबाद असे छापलेले आहे. संस्थेचा बनावट रजिस्ट्रेशन नंबरही यावर आहे.