खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

By सदानंद सिरसाट | Published: April 23, 2024 11:11 PM2024-04-23T23:11:16+5:302024-04-23T23:12:14+5:30

ठाकरे यांच्या तोंडात जय भवानी, कामात बेइमानी

cm eknath shinde taunt thackeray in a rally in khamgaon | खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

सदानंद सिरसाट, खामगाव : उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्या फक्त तोंडातच जय भवानी आहे. सर्वसामान्यांची आणि विकासकामे करताना त्यांच्यात बेइमानी असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खामगावातील प्रचारसभेत बोलताना केला.

शहरातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी महायुतीचे (शिंदेसेना) उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, श्वेता महाले यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे यांनी, उद्धव ठाकरे खामगावातील सभेत जे बोलले ते कुणालाच कळले नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. त्यातच त्यांच्या आघाडीत सहभागी असलेल्यांचे सध्या गळ्यात गळे असले तरी ते पायात पाय टाकून एकमेकांना पाडणार असल्याचे सांगितले.

कातडे पांघरूण कोणीही वाघ होऊ शकत नाही. असली आणि नकली वाघातील फरक जनतेला चांगला माहिती आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, त्यामुळेच त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन केल्याचेही ते म्हणाले. आमच्या सरकारच्या काळातील कामाचे विचारतात, त्यांनी आरसा पाहिल्यास त्यांना त्यांच्या कामाची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, असेही शिंदे म्हणाले. 

देशात महायुतीच सक्षम पर्याय - फडणवीस

सद्य:स्थितीत देशातील जनतेपुढे दोनच पर्याय आहेत. त्यामध्ये सक्षम महायुती तर दुसरीकडे प्रचंड गोंधळ असलेली महाआघाडी आहे. मोदी यांच्या नेतृत्वात विविध पक्ष एकसंघपणे एका इंजिनला जोडलेले डबे आहेत. तर महाआघाडीत प्रत्येक पक्षच इंजिन असल्याने त्यांची दिशा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांची गाडी धावतच नाही, जागेवरच राहणार आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचा वाटा देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी नकार दिला. त्यामुळे ते काम रखडले होते. त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे काम आमच्या सरकारने केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केले...

बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार नसल्याने त्यातून बाहेर पडत सरकार स्थापन करण्याचे ऑपरेशन केले. आपण डाॅक्टर नसलो तरी अशी अनेक ऑपरेशन फत्ते केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बाप नंबरी, बेटा दस नंबरी...

उबाठा सेनेत सध्या काय चालू आहे, कुणाचेच कुणाला कळत नाही. ती सेना दोघा बापलेकांची आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांना स्थान नाही. त्यातही दोघांची प्रवृत्ती म्हणजे, बाप नंबरी, बेटा दस नंबरी असल्याचा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला.
 

Web Title: cm eknath shinde taunt thackeray in a rally in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.