शेगाव : शेगावात फिरण्यासाठी आलेल्या नागपूर येथील चार मद्यधुंद कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलाच हैदोस घातला होता. मद्यधुंद अवस्थेत एका एसटी चालकाला मारहाण केल्यानंतर या कार्यकर्त्यांची नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. बुधवारी शेगाव आगाराचे एसटी. चालक शेख सादिक हे बसस्थानकाकडे बस आणत असताना एम.एच. ३१ डीसी २७२७ या इनोव्हा गाडीच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन गजानन महाविद्यालयाजवळ एसटीसमोर आडवे करून बस थांबविली व आमच्या गाडीला ओव्हरटेक कसे केले असे म्हणत वाद घातला व चालकाला मारहाण करून गाडी घेऊन पसार झाले. चालकाने सदर बाब शहरात आल्यावर आपल्या नातेवाइकांना सांगितली. यानंतर नागरिकांनी गाडीची शोधाशोध केली असता मंदिराजवळ दिसून आली; मात्र आपल्याला लोक शोधत आहे हे कळताच आपली गाडी सिनेस्टाईल खामगावकडे पळविली. यानंतर लासुरा फाट्याजवळील एका ढाब्यावर बसले असता नागरिकांनी तेथे जाऊन चौघांची यथेच्छ धुलाई केली व याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर एपीआय तावडे यांनी घटनास्थळ गाठून चौघा युवकांना ताब्यात घेतले. यावेळी या चौघांनी आपण भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती नागपूरपर्यंत पोहचल्यानंतर शेगावातील भाजपाच्या पदाधिकार्यांना या प्रकरणाची माहिती देऊन निपटविण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर पो.स्टे.ला सदर प्रकरण आपसात झाल्याची नोंद स्टेशन डायरीवर करण्यात आली आहे.
मद्यधुंद चौघांना नागरिकांनी चोपले
By admin | Updated: May 9, 2014 00:31 IST