बुलडाणा: जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक बाधित स्रोतांची संख्या व रासायनिक घटकांचे वाढलेले प्रमाण घातक आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्यावतीने मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या रासायनिक तपासणीचा कार्यक्रम बुलडाणा जिल्ह्यात राबविला जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील दूषित पाणीसाठय़ांची भौगोलिक माहिती प्रणालीच्या (जीआयएस) या प्रणालीद्वारे मॅपिंग करण्यात आले आहे.पाणीपुरवठा विभाग, जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी गतवर्षी करण्यात आली. यात प्रत्येकी चारशे स्रोतांचे नमुने तपासल्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक बाधित स्रोतांची संख्या व रासानियक घटकांचे प्रमाण वाढलेले आढळून आले. ही बाब गांभीर्याने घेऊन आरोग्य विभाग प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विभागीय प्रयोगशाळा यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्यातील एचपी, सॉलिड, फ्लोराईड, नाईट्रेड, आयर्न हे पाच घटक तपासले जातील.ग्रामीण स्तरावरील पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित आढळल्याने सर्व ग्रामपंचायतींतून हे अभियान राबविल्या जाणार आहे. यात जलसुरक्षक पाणी नमुने गोळा करून आरोग्य सेवकाकडे देतील. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील सर्व गावांतील स्रोतांच्या पाणी नमुन्यांचे एकत्रीकरण करून ते नमुने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयोगशाळेत पाठविले जाईल. सर्व पाणी नुमन्याची तपासणी नियोजनाची जबाबदारी पाणी गुणवत्ता निरीक्षक व सल्लागार तसेच जिल्हा प्रयोगशाळा प्रमुख यांनी राहणार आहे.
पाणी स्रोतांची रासायनिक तपासणी होणार
By admin | Updated: February 3, 2015 00:19 IST