हा घरफोडीचा प्रकार १८ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. प्रकरणी ग्रामीण पोलीस सध्या त्याचा तपास करीत आहेत. कोरोना संकटामुळे बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेत. दुकाने बंद आहेत. अशा स्थितीत मात्र चोरटे सक्रिय झाले आहेत. १८ एप्रिल रोजी नांद्राकोळी येथील अफसरशहा मकबुलशहा हे कुटुंबीयांसह पोर्चमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ७६ हजारांचे सोने-चांदीचे दागिने, पाकिटामधील १ लाख ६० हजार रुपये व पँटच्या खिशातील नगदी एक लाख रुपये असा ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, पहाटे अफसरशहा यांची पत्नी रमाननिमित्त उठली असता हा संपूर्ण प्रकार तिच्या निदर्शनास आला. चोरट्यांनी या एका घरातच चोरी केली नाही, तर जवळच असलेल्या शिवदास धनेश्वर यांच्या घरातही घुसून चोरट्यांनी लोखंडी पेटीतील नगदी ५० हजार रुपये, २५ हजार रुपये किमतीचे दागिने असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
नांद्राकोळीत घरफोडी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST