चिखली (बुलढाणा) : तालुक्यातील रोहडा येथील एका लग्न समारंभातून शुक्रवारपासून हरविलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा २८ तासांनंतर याच परिसरात मृतदेह आढळून आला. या चिमुकलीचे अपहरण करून तिचा निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.रोहडा येथे एका लग्न संभारंभासाठी आई-वडिल आपल्या सहा वर्षीय मुलीसह आले होते. दरम्यान, परिसरातून सकाळी ११ वाजेपासून चिमुरडी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून सर्वत्र तिचा शोध घेणे सुरू होते. याकामी पोलीस प्रशासनासह २०० ते २५० लोकांनी पुढाकार घेतला होता.दरम्यान, दि. १३ मे रोजी देखील सर्वत्र शोधकार्य सुरू असताना २८ तासांनंतर संस्थान परिसरात ५०० मीटर अंतरावर डोंगराळ परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. मृतक मुलीचा चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आल्याचे आढळून आल्याने चिमुकलीची निर्घृण हत्या झाल्याचा कयास व्यक्त होत आहे.
बुलढाणा : बेपत्ता मुलीचा अखेर मृतदेहच आढळला, अपहरण करून हत्या केल्याची शक्यता
By संदीप वानखेडे | Updated: May 13, 2023 18:53 IST