आधार लिंकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ 'जेमतेम', शहरी भागात उदासिनता

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 12, 2022 05:48 PM2022-09-12T17:48:20+5:302022-09-12T17:48:56+5:30

आधार लिकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. 

Buldhana assembly constituency has turned its back on Aadhaar linking | आधार लिंकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ 'जेमतेम', शहरी भागात उदासिनता

आधार लिंकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ 'जेमतेम', शहरी भागात उदासिनता

googlenewsNext

बुलढाणा : बोगस मतदानाला आळा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदान कार्डला आधार कार्डची जोड देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ३६.६५ टक्के आधार लिंकिंग झाले असून, सर्वात कमी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अवघे १६.८३ टक्के असे जेमतेम लिकिंग झाले आहेत. आधार लिंकिंग करण्यामध्ये ग्रामीण भागापेक्षाही शहरी भागातील मतदारांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. यामध्ये कामचुकार कर्मचारी निवडणूक विभागाच्या रडारवर आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २० लाख ३५ हजार ७७८ मतदार आहेत. सर्व मतदारांच्या मतदान कार्डामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मतदान आणि आधार कार्ड याची ऑनलाइन लिंकिंग करण्यात येत आहे. मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. एक मतदार दोन ठिकाणचे मतदान ओळखपत्र वापरत असेल, तर आधार कार्डच्या लिंकिंगमुळे या बोगस मतदारांवर चाप बसणार आहे. मतदान आणि आधार कार्ड जोडणीचे काम शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. 

परंतु काही कर्मचारी या कामासाठी टाळाटाळ करत असल्याचा प्रकार मेहकर, लोणार तालुक्यात समोर आला होता. दरम्यान, त्या भागातील ३० शिक्षकांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटीसही बजावली. यात सर्वाधिक शिक्षक हे शहरी भागातील आहेत. त्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघातील आधार लिंकिंगचे काम झपाट्याने वाढले. परंतु सध्या सात मतदारसंघापैकी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी केवळ १६.८३ टक्केच काम झालेले आहे. आधार लिंकिंगच्या कामामध्ये दिरंगाई करणारे कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येत आहेत. तर कुठे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.

जिल्ह्यात मतदान कार्डला आधार लिंकिंगचे काम ३६.६५ टक्के झाले आहे. ज्या ठिकाणचे प्रमाण कमी आहे, त्यांना लिंकिंगचे काम वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लिंकिंगच्या कामांमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची नजर आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी दिली. 

जळगाव जामोद, मेहकर मतदारसंघ आघाडीवर
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी जळगाव जामोद आणि मेहकर विधानसभा मतदारसंघ आधार लिंकिंगच्या कामात आघाडीवर आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघसात आतापर्यंत ५५. ९३ टक्के काम झाले आहे. त्यापाठोपाठ मेहकर विधानसभा मतदारसंघात ५०.२० टक्के लिंकिंग झाले आहे.



 

Web Title: Buldhana assembly constituency has turned its back on Aadhaar linking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.