कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्वाध्याय हा उपक्रम राज्यात सुरू आहे. स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न नियमितपणे सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन प्रश्न स्वाध्यायमध्ये समाविष्ट करून ते व्हाट्स ॲपद्वारे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातात. या स्वाध्याय उपक्रमाच्या अठराव्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातून २ लाख ९६ हजार २७ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले. त्यानंतर २ लाख ८९ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी ते पूर्णही केले आहे. स्वाध्याय उपक्रमाच्या या १८ व्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
प्रभावी अंमलबजावणी
जिल्ह्यातील स्वाध्याय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक -समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, मोबाईल टीचर, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहे.
सामूहिक प्रयत्नांमुळे स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्ह्याला राज्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त झाला, त्याबद्दल आनंद वाटतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे शिक्षण भविष्यातही थांबू नये, यासाठी सर्वांकडून असेच प्रयत्न होणे आवश्यक आहे.
- भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बुलडाणा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अध्ययन व मूल्यमापनासाठी अतिशय सहाय्यकारी असा हा स्वाध्याय उपक्रम आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे लक्ष्य आहे. -डॉ. विजयकुमार शिंदे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.
पर्यवेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेशी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय यातून हे यश प्राप्त केले आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).
आताच्या आव्हानात्मक परिस्थितीत जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडू नये, या हेतूने काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांकडून भविष्यातही अशाच प्रयत्नांची अपेक्षा आहे.
-सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक).
राज्यातून पहिल्या तीन स्थानावर असलेले जिल्हे आणि विद्यार्थी संख्या
बुलडाणा २९६०२७
जळगाव २९२४६४
सोलापूर २१६४३५
स्वाध्याय उपक्रमात बुलडाण्याची स्थिती
४५४९१५ एकूण विद्यार्थी
३६९२७६ नोंदणी केलेले विद्यार्थी
२९६०२७ स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी
२८९६०८ स्वाध्याय पूर्ण करणारे विद्यार्थी