रुग्णालय परिसरात घाण
बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाण कचरा साचलेला दिसून येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर याच रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच चारचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पावसामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ
लोणार : लोणार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. तसेच नदी, नाले व विहिरीची पातळीही या पावसामुळे वाढत आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, हळद, मूग, उडीद या पिकांना हा पाऊस समाधानकारक व पोषक ठरत आहे. सध्या तरी पीक परिस्थिती चांगली आहे.
जनुना येथे संत लक्ष्मण चैतन्य बापूंची जयंती
दुसरबीड : येथून जवळच असलेल्या जनुना तांडा येथे संत लक्ष्मण चैतन्य बापूंची ५३ वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली. यावेळी लक्ष्मण बापूंच्या गीतांवर आणि भजनावर भाविकांनी नृत्य केले. विठ्ठल हिरामण राठोड यांच्याद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाविकांना व्यसनमुक्त संदेश, पर्यावरण रक्षणाची माहिती देण्यात आली. यावेळी गावातील वरिष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला.