- अनिल गवईखामगाव: अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालणा-या प.पू. भय्यूजी महाराजांनी रजतनगरी(खामगाव)शी देखील याच माध्यमातून आपल्या नात्याची वीण घट्ट केल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशातील इंदूरनंतर पश्चिम विदर्भातील खामगाव येथे सन २००५ मध्ये महासिध्दपीठ ऋषी संकुल स्थापन केले. या संकुलाच्या स्थापनेनंतर प.पू.भय्युजी महाराजांचं खामगावशी घट्ट नातं जोडल्या गेलं. या आश्रमात त्यांचे नियमित येणे जाणे राहायचे. मात्र, आता भय्यूजी महाराजांच्या अकाली जाण्याने सजनपुरी येथील आश्रम ‘मुका’झाला आहे.अध्यात्मिक क्षेत्रात अलौकीक उंची गाठलेल्या प.पू. भय्युजी महाराजांच्या साधकांनी खामगाव बायपासवरील सजनपुरीच्या विस्तीर्ण परिसरात महासिध्दपीठ ऋषी संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १ मे २००५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते श्री. सदगुरू धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट इंदौर, शाखा खामगाव (ऋषी संकुल)चे भूमिपूजन झाले. भय्यूजी महाराजांनी या ठिकाणी विविध देवतेच्या मंदिरांसोबतच मराठी मनाच्या शौर्याचा इतिहासाची प्रेरणा असलेल्या राजे संभाजीचे स्मारकही निर्माण केले. खामगाव शहराचा धार्मिक वसा म्हणून अल्पावधीत पुढे आलेल्या ऋषीसंकुलात श्री गणपती, श्री शेषनाग, श्री हनुमान, श्री कालिका, श्री महादेव, श्री गुरूदेव दत्त, सिध्द औदुंबर, माता अन्नपुर्णा, संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ धुनी, श्री काल भैरव मंदिरासोबतच शनी मंदिरही निर्माण केले. या ठिकाणी भय्यूजी महाराजांची गादी विराजीत असून नवरात्री आणि शनि अमावश्येला याठिकाणी मोठे धार्मिक उत्सव पार पडतात. विज्ञानाला अध्यात्माची जोड देत अनेक सामाजिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ ऋषीसंकुलातून रोवल्या जात होती. विधायक कार्याला हातभार म्हणून अनेक हात समोर येत होते. दरम्यान, सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळच्या माध्यमातून फासे पारधी समाजातील अनेक मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात आलीत. त्याचप्रमाणे परिसरातील गरीब, कष्टकरी आणि आत्महत्या ग्रस्त शेतक-यांसाठी मोठा आधार ऋषीसंकुल नावारूपाला आले होते. १०-१२ वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटं ऐन बहरात असतानाच, वृक्षाचा आधारवड खचला. त्यामुळे ऋषीसंकुलाशी नातं जोडलेले हजारो हात आता ‘अनाथ’ झाले आहेत. भय्यूजी महाराजांच्या निधनाने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
Bhaiyyuji Maharaj suicide : अध्यात्मातून जोडली खामगावशी ‘नाळ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 19:45 IST