नारायण सावतकार, लोकमत न्युज नेटवर्क, संग्रामपूर (जि.बुलढाणा): हिंदी चित्रपटांमध्ये आपण अनेकदा पाहतो घरातून हरवलेली व्यक्ती वर्षानुवर्षांनंतर अचानक परत येते. असंच एक रील लाईफसारखं पण वास्तवात घडलेलं हृदयस्पर्शी प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील टाकळेश्वर गावात घडले. २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेले अवचितराव गुलाबराव मोरखडे हे अखेर आपल्या गावी आणि कुटुंबात पुन्हा परतले.
संग्रामपूर तालुक्यातील चोंढी टाकळेश्वर येथील अवचितराव काही वर्षांपूर्वी कुटुंबीयांसोबत गुजरातला गेले होते. मात्र, कुटुंबातील वादामुळे ते रागाच्या भरात घर सोडून निघून गेले. त्यानंतर कुणालाही त्यांच्या ठिकाणाची माहिती राहिली नाही. अनेकांनी त्यांचा मृत्यू झाल्याचेही गृहित धरले होते. अवचितराव गुजरातमधील बडोदा येथे काही मित्रांच्या साह्याने मजुरी करू लागले. पुढे परिश्रम व नियोजनाच्या जोरावर त्यांनी स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली आणि एक यशस्वी जीवन उभं केलं.
पंढरपूरच्या यात्रेने जागवली आठवण
यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवचितराव पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. तिथे घराची आणि आपल्या मुळगावाची ओढ त्यांच्या मनात पुन्हा जागी झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावाशी संपर्क साधला आणि शेवटी २० वर्षांनी टाकळेश्वर गावात परतले.
घोड्यावरून मिरवणूक, फुलांचा वर्षाव
गावात परतल्यानंतर त्यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. नातेवाइक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तर होतेच, पण चेहऱ्यावर अत्यानंद होता. एक हरवलेला माणूस पुन्हा मिळाल्याचा अनुभव गावकरी शब्दांत सांगू शकत नव्हते.
गाव गहिवरले अन्...
अवचितराव यांनी या कालावधीत आर्थिकदृष्ट्या प्रगती केली असली तरी मनातल्या एका कोपऱ्यात कुटुंबाची ओढ कायम राहिली. अखेर विठुरायाच्या चरणी नमस्कार केल्यानंतर त्यांच्या जीवनातील हरवलेली माळ पुन्हा जुळून आली. गावकऱ्यांप्रमाणेच संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा रंगली असून, ‘विठुरायाच्या कृपेने घरात पुन्हा सोनं आलं,’ असं लोक आवर्जून म्हणताना दिसत आहेत.