सिंदखेडराजा : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक काळात प्रचार व अन्य कामांसाठी होणाऱ्या दैनंदिन खर्चाचे विवरण निवडणूक विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल बँकेत प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक आहे. मात्र बँकांमधील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या असून, उमेदवारांना बँक खाते उघडण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले आहे.
उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागत आहे. त्याच बरोबर दररोजचा खर्च नव्याने उघडलेल्या बँक खात्यामधूनच करावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे अर्ज भरण्याची लगबग, तर दुसरीकडे अर्ज भरल्याचा पहिल्याच दिवसापासून द्यावा लागणाऱ्या खर्चाचे विवरण उमेदवारांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. अनेक बँका स्वतंत्र खाते उघडण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेल्या होत्या. त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून उमेदवारांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी बँकांना अनुमती दिली असून, त्याचे जिल्हाधिकारी यांनी सक्षम यंत्रणेद्वारे निरीक्षण करून उमेदवारांना बँकेत स्वतंत्र बचत किंवा चालू खाते उघडण्यास सहकार्य करावे, असे म्हटले आहे.