लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपिड टेस्टद्वारे तपासण्यात आलेल्या संदिग्ध रुग्णांपैकी ६२३ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी ५७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा १२ हजारांच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे मलकापूर येथील एकाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५ झाली आहे.शुक्रवारी तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यामध्ये शेगाव येथील सहा, देऊळगाव राजा येथील पाच, बुलडाणा दहा, खामगाव एक, शेंदुर्जन दोन, नागझरी तीन, आंधई एक, नायगाव एक, वरखेड दोन, चिखली पाच, मलकापूर पाच, धरणगाव एक, बोथाकाजी एक, माळेगाव गोंड एक, नांदुरा एक, टाकळी एक, धामणगाव एक, शेलापूरमधील चार जणांचा यात समावेश आहे. दरम्यान मलकापूर येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे शुक्रवारी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २१ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधील सात, नांदुरा तीन, सिंदखेड राजा तीन, खामगाव तीन, लोणार तीन आणि चिखली येथील दोन जणांचा यात समावेश आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत तपासण्यात आलेल्या कोरोना संदिग्ध रुग्णांपैकी ८२ हजार ९९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर कोरोना बाधितांपैकी ११ हजार ५९३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही १,८९० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, रुग्णालयात ३०० सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १२ हजार ३८ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.२० टक्क्यांवर स्थिर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता जिल्ह्यात वाढले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
पॉझिटिव्हीटी रेट १४ टक्क्यांवरजिल्ह्यात तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८८ हजार २९० जणांचे अहवाल १८ डिसेंबरपर्यंत प्राप्त झाले आहेत. यापैकी १३.६३ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा अद्यापही १४ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के असून, जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.२० टक्क्यांवर स्थिर आहे. आतापर्यंत १४५ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.