सिंदखेड राजा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी ७७. ५९ टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाल्याची नोंद होती तर साडेतीन वाजेपर्यंत हा आकडा ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. साडेपाचपर्यंत तालुक्यात ७७.५९ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी तुरळक वाद वगळता मोठा अनुचित प्रकार कुठेच घडला नाही. सकाळी मतदानाचा ओघ जास्त होता मात्र दुपारच्या वेळी मतदान खूपच धीम्या पद्धतीने सुरू होते अनेक केंद्रावर तर मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची वाट पाहावी लागल्याचे चित्र होते.
तालुक्यातील साखरखेर्डा व दुसर बीड या दोन मोठ्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष होते. पण येथेही मतदान शांततेत पार पडले.तहसीलदार सुनील सावंत,निवडणूक निरीक्षक,निवडणुकीची जबाबदारी असलेले नायब तहसीलदार अंगद लटके, पापूलवार आदी अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रावर जाऊन कुठे अडचण येणार नाही याची काळजी घेतली.दरम्यान,पोलीस बंदोबस्त तगडा असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सर्व मशीन कार्यरत
४० ग्रामपंचायतीसाठी १३७ बूथ वर हे मतदान झाले. यासाठी जवळपास सहाशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदानात कुठेही ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे वृत्त नाही. साखरखेर्डा येथील उर्दू शाळेतील बूथवर सकाळी काही वेळ गोंधळ झाला पण प्रशासन सतर्क असल्याने अनुचित प्रकार टाळता आला.