नांदुरा: नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा शहरातून जात असल्याने धोकादायक ठरत असून मृत्यूचा सापळा ठरत असल्याने अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या वर्षभरात या राष्ट्रीय महामार्गावर केवळ नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४१ अपघात झाले. यामध्ये २६ जण आपल्या प्राणास मुकले तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले. चालु वर्षात यामध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. १ जानेवारी ते आतापर्यंत १७ अपघातामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग नांदुरा शहराच्या मध्यभागातून जातो. शहरात या रोडवर नगर पालिका, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, स्टेट बँक, इंडिया बँक यासह शहरातील नागरीकांना रेल्वे स्टेशनवर सुध्दा जायचे म्हटले तर हायवे ओलांडूनच जावे लागते. विविध शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, विविध दुकाने याच रोडवर असल्यामुळे या भागात नेहमी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गाची जड वाहतूक शहरातून खामगाव, मलकापूरकडे जाणारी प्रवासी वाहने आणि शहरातील वाहतूक यामुळे या रोडवर प्रचंड गर्दी राहते. यामध्ये अनेकवेळा अपघात घडतात व काहींना आपला जीव गमवावा लागतो व तर काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा शहराबाहेर हलवा, अशी अनेक दिवसापासून येथील नागरीकांची मागणी आहे. पुढार्यांनी तथा लोकप्रतिनिधींनी याकडे गंभीरतेने लक्ष देवून नांदुरा बायपास त्वरित गावाबाहेरुन काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे. बायपास मंजूर पण काम रखडले कंपनीकडून दर वाढविण्याची मागणी गेल्या दोन वर्षापूर्वी नांदुरा शहराला बायपास मंजूर झाला आहे. या कामाबाबतचा प्रत्यक्ष आराखडा सुध्दा तयार करण्यात आला आहे. मात्र ज्या लारसन्स अँड ट्युब्रो कंपनीने हा ठेका घेतला होता त्या कंपनीने आता काम करण्यास नकार दिला असल्याचे समजते. सदर कंपनी साहित्याचे भाव वाढल्यामुळे दर वाढवून मागत आहे, असे समजते.
वर्षभरात घेतला २६ जणांचा बळी
By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST