नाना हिवराळे /खामगाव खामगावहून शेगावकडे जाताना शहर सोडताच संत गजानन महाराजांचा रस्ता उजाड दिसत असल्याने या मार्गाला आता हरित करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. या मार्गाच्या दुतर्फा १८00 झाडांची लागवड झाली असून, दरवर्षी पायदळ दिंडीत जाणार्या भक्तांना विसावा म्हणून झाडांची सावली मिळणार आहे.शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातूनही भक्त मोठय़ा प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. दररोज हजारो भक्तांची ये-जा संतनगरीत चालू आहे. दरवर्षी शेकडो दिंड्या राज्यभरातून पायदळ शेगावला येतात. पायी दिंडीत सहभागी झाल्यानंतर खामगाव शहर सोडताच शेगाव रस्ता हा उजाड वाटतो. तेव्हा या संतनगरीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडे जगवून रस्ता सुशोभीकरणासाठी खामगाव येथील सामाजिक वनीकरण विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने शेगाव रोडवरील वरखेड ते लासुरा फाट्यापर्यंत सुमारे १८00 वृक्षांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी विशेष काम म्हणून संतनगरीच्या मार्गावरील झाडांकडे लक्ष देऊन ते जगविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने या मार्गावर निंब, करंज, गुलमोहर, पेल्टोफार्म, अमलतास, कांचन, शिशू, महारुख व वड आदी प्रजातीची झाडे लावली आहेत. तीन वर्षाच्या संगोपनानंतर ही झाडे भक्तांना विसावा देतील, असा विश्वास सामाजिक वनीकरण विभागाला आहे.
सामाजिक वनीकरणाच्या पुढाकाराने १८00 झाडांची लागवड
By admin | Updated: September 19, 2014 00:20 IST