राम गणेशांना आठवताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:44 PM2018-02-23T23:44:30+5:302018-02-23T23:44:30+5:30

२३ जानेवारी १९१९ हा राम गणेश गडकरींंचा स्मृतीदिन. हे वर्ष गडकरींचे स्मृतीवर्ष आहे. त्यांना जाऊन १०० वर्षे पूर्ण झाली तरी गडकरींची स्मृती रसिकांच्या मनात टवटवीत सुगंधित आहे.

Remembering Ram Ganesha | राम गणेशांना आठवताना

राम गणेशांना आठवताना

Next

- प्रा. अरुण मैड
२३ जानेवारी १९१९ हा राम गणेश गडकरींंचा स्मृतीदिन. हे वर्ष गडकरींचे स्मृतीवर्ष आहे. त्यांना जाऊन १०० वर्षे पूर्ण झाली तरी गडकरींची स्मृती रसिकांच्या मनात टवटवीत सुगंधित आहे. गडकरी विस्मृतीत गेले नाहीत. कवी गोविंदाग्रज नावाचे गडकरी, बाळकराम नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी आणि सुधाकर, सिंधु, तळीराम, गोकुळ, गीता, मथुरा, कंकण अशा चिरस्मरणीय मानसपुत्र आणि मानसकन्यकांचा पिता असलेल्या नाटककार गडकरींना कोण विसरेल?

शाळकरी वयात अलंकार शिकताना आणि शिकवितानासुद्धा मदतीला कोण धाऊन यायचे गडकरी मास्तरच ना? आमच्या शालेय जीवनातच विसरभोळा गोकुळ भेटला, आठवण राहण्यासाठी त्याने वस्त्राला मारलेल्या गाठी आठवून आजही हसू अनावर होते. आज एखादी कौटुंबिक बैठक बसली की तिथे गडकºयांचे विनोद, कोट्या नेतृत्व करतात. भुताखेतांवर विश्वास ठेवणारे अंधश्रद्धाळू गडकरी त्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे सर्वांना हवेहवेसे वाटतात. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मखांचा म्हणणारे गोविंदाग्रज प्रेमविरांना जवळचे वाटतात. केशवसुतांचा सच्चा चेला म्हणविणारे गोविंदाग्रज एका कवितेत म्हणतात,
केशवसुत कसले मेले, केशवसुत गातची बसले
गोविंदाग्रज-गडकºयांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल, हे जग सोडून गेल्यानंतरही
गडकरी कसले गेले, गडकरी हसतच बसले
इतकी अफाट प्रतिभा असलेला हा शब्दप्रभू शालेय जीवनात कुठेच चमकला नाही. शाळेत जाण्याचाच त्यांना फार कंटाळा होता. गडकºयांचे वडील नोकरीच्या निमित्ताने गुजरात राज्यात गेले, त्यामुळे गडकºयांचा जन्म २६ मे १८८५ रोजी नवसारी येथे झाला. आपल्या थोरल्या बंधूची स्मृती म्हणून त्यांनी ‘गोविंदाग्रज’ हे नाव कविता लेखनासाठी घेतले. तरुणपणी आपल्या जिभेवर रसवंती नाचविणारा हा सरस्वतीचा उपासक याला बराच काळ बालपणी बोलताही येत नव्हते. यावर कोणी विश्वास ठेवेल काय? बालपणी सर्वजण त्यांना लालजी या टोपणनावाने हाक मारीत असत. लालजीला शाळेचा असलेला तिटकारा पाहून वडील गणेशपंत त्यांना घरीच शिकवित असत. लालजी वडिलांचाही फारच लाडका होता; पण लालजी आठ वर्षाचा असतानाच दीर्घ आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या पाठोपाठ भाऊ गोविंदही हे जग सोडून गेला. डोक्यावर आभाळ फाटलेल्या आईने आपल्या पिलांना घेऊन कर्जत (जि. रायगड) गाठले. त्यांचे मूळ गाव सांगवी. कर्जत तालुक्यातील होते. त्या काळात गडकरी कुटुंब आजच्या कर्जत पूर्वेला भिसेगावाजवळ राहत होते.
वडील व भाऊ गोविंद यांच्या निधनाने छोटा राम हादरून गेला. शालेय अभ्यासात कुठेच आधार सापडत नव्हता. या काळात श्रीखराच्या पांडवप्रताप, हरिविजयसारख्या ग्रंथांनी रामचे मन सावरले व शब्दांची जादू, शब्दवैभव त्याला जाणवले. आपणही असेच काहीतरी लिहावे, असे वाटू लागले. मनाच्या या घालमेलीत वयाच्या बाराव्या वर्षी रामने एक नाटक लिहून टाकले व नुसतेच लिहिले नाही तर थेट अण्णासाहेब किर्लोस्करांना नेऊन दाखविले. अण्णासाहेबांच्या प्रतिष्ठित नाटक कंपनीत रामच्या बाळबोध नाटकाचे जे व्हायला पाहिजे तेच झाले. अण्णासाहेबांनी नाटक साभार परत केले पण अण्णासाहेब किर्लोस्करांना त्याक्षणी तरी वाटले नसेल की, याच राम गणेश गडकºयांच्या घरी त्यांना ‘नाटक लिहून द्या’ हे सांगण्यासाठी किती फेºया माराव्या लागणार आहेत.
जगविख्यात नाटककार शेक्सपियरने इंग्लडच्या नाट्यगृहाच्या दाराशी उभे राहून नाट्यसंपेपर्यंत श्रीमंत उमरावांचे घोडे सांभाळण्याचे काम केले. नाट्यगृहाच्या दाराशी दरवान म्हणून काम केले, तसेच या महाराष्टÑाच्या शेक्सपियरनेसुद्धा काही कमी दुर्दैवाचे दशावतार पाहिले नाहीत. वडिलांच्या निधनानंतर कुटुंंबासाठी लाकडे विकणे, दूध विकणे, भाज्या विकणे ही सर्व कामे त्यांनी कर्जत मुक्कामी केली. मुलांच्या शिक्षणासाठी आई बिºहाड घेऊन पुण्याला आली तिथे लालजीने मुंढव्याच्या कागद गिरणीत हेल्पर, फिटर अशी सारी कामे केली. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सीताबाईबरोबर पहिला विवाह. विवाहानंतर मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रिव्हियस-एफ.वाय. परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. किर्लोस्कर नाटक मंडळीत कलाकारांच्या लहान मुलांचे मास्तर म्हणून नोकरी करू लागले. त्याच वर्शी बार्शीला जाणाºया गाडीत तात्यासाहेब कोल्हटकर (श्री.कृ.कोल्हटकर) यांची गाठ पडली. तात्यासाहेबांच्या भेटीने नाटकांनी प्रभावित होऊन ‘कोल्हटकरांच्या नाटकांतील सुंदर उतारे’ हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर गडकºयांच्या लेखणीने नाट्य, काव्य, विनोदी लेखन या साहित्याच्या दालनात स्वैर संचार केला. १९०९ साली त्यांच्या मनात प्रेमसन्यास नाटकाचे कथानक घोळू लागले होते. १९१२ साली गडकºयांचे पहिले नाटक ‘प्रेमसन्यास’ महाराष्टÑ नाटक मंडळीने रंगभूमीवर आणले. याचा पहिला प्रयोग मुुंबईत झाला. १९१३ ला ‘पुण्यप्रभाव’ लिहिले. खाडीलकर, कोल्हटकरांचा प्रभाव ओसरत असतानाच गडकºयांचा तेजोमय तारा उदयाचलावर आपल्या देदीप्यमान तेजाने नाट्यरसिकांचे डोळे दीपवीत होता. ‘एकच प्याला’ला अफाट किर्ती मिळविली. गडकºयांचे ‘भावबंधन’ हे नाटक बलवंत नाटक मंडळीसाठी लिहिले गेले. राजसन्यास, गर्वनिर्वाण व वेड्यांचा बाजार ही गडकºयांची अपूर्ण नाटकांची(एक वेड्यांचा बाजार’चा अपवाद सोडल्यास) शीर्षक पंचाक्षरी आहेत. हे सुद्धा गडकºयांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
१९१८ साली भावबंधनाचे लेखन चालू असतानाच गडकºयांना ताप येऊ लागला. प्रकृती अस्वास्थामुळे थोरल्या बंधूकडे सावनेर (वºहाड) येथे प्रयाण केले. रात्री ‘भावबंधन’चा शेवटचा अंक लिहून नाटक पूर्ण केले. त्याच रात्री सावनेर येथे गडकºयांच्या नाट्यमय आयुष्यावर शेवटचा पडदा पडला. वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी हा शब्दांचा जादूगार रंगदेवतेचा अखेरचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेला.
मृत्यूपूर्वी गडकºयांनी लिहून ठेवलं होतं, ‘माझ्या पेटीमध्ये मी ज्या नवसारीच्या घरात जन्माला आलो, त्या जन्मभूमीची माती एका पुडीत ठेवली आहे. शेवटच्या प्रवासाला निघताना ती माती माझ्या तोंडात टाकावी.’ माती इतकी श्रेष्ठ की तिच्या पोटी हिºयाला अन् सोन्याला जन्म घ्यावा लागतो. माती म्हणजे मोठी माता हे गडकºयांना समजले होते म्हणूनच तिचे बोट धरूनच ते निघून गेले.

                  arunmaid@rediffmail.com 

Web Title: Remembering Ram Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.