सलामी झडली, आता खडाखडी - कारण-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:26 PM2018-09-05T23:26:54+5:302018-09-05T23:30:22+5:30

 Salam shakti, now Khandakhali - cause-politics | सलामी झडली, आता खडाखडी - कारण-राजकारण

सलामी झडली, आता खडाखडी - कारण-राजकारण

Next


श्रीनिवास नागे
सांगली जिल्ह्यातलं एकेक सत्ताकेंद्र हातातून जात असताना हतबल होत असलेले वस्ताद... पराभूत मानसिकतेतून पैलवानांची सुटत असलेली लांग... मित्रपक्ष आणि विरोधकांच्या जोरबैठका... वर्षभरावर येऊन ठेपलेलं निवडणुकांचं मैदान... या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढून वातावरण तर तापवलंच, पण विधानसभेच्या सोयीच्या आणि दावा करता येणाऱ्या चार जागांवर शड्डू ठोकून जोरकस सलामीही दिली. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत जोड कुणाचा द्यायचा, हे आता मैदानातच जाहीर होणार असल्याचं प्रकर्षानं दिसून आलं.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीत गटबाजी आणि एकमेकांच्या पायात पाय घालण्यानं काँग्रेसला भाजपनं बघताबघता धोबीपछाड दिला. अगदी राष्टÑवादीचे पैलवान सोबतीला असतानाही कुस्तीत पाठ लागली. हे शेवटचं सत्ताकेंद्र गेल्यानंतर काँग्रेसचे सारेच वस्ताद बावरले. चंद्रकांतदादांचं तेल लावलेल्या भाजपच्या मल्लांनी काँग्रेसच्या तावडीतून सटकन् सुटत ‘टांग’ मारली! थोडक्या जागांनी मैदान गेलं. पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. लोकसभेचं मैदान तोंडावर, तर विधानसभेचं सव्वावर्षावर आलंय. डाव मारण्याची संधी असतानाही कार्यकर्त्यांची पराभूत मानसिकता लढतीवेळी कशी हाराकिरी करते, हे वारंवार सिद्ध झालंय. आता तर त्यांची लांग सुटायला लागलीय. त्यातच मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीला जयंत पाटलांसारखे राज्यस्तरावरचं मैदान सांभाळणारे नवे वस्ताद मिळालेत. त्यांनी आधीच जोरबैठका सुरू केल्यात. हल्लाबोल यात्रा काढून राज्यातल्या आपल्या पैलवानांची चाचपणी केलीय. भाजपच्या आखाड्यातही तगड्या पैलवानांचा सराव सुरू झालाय. त्यामुळं मग काँग्रेसच्या तमाम वस्तादांनी जनसंघर्ष यात्रेचा डाव टाकला. पण त्यातील मुख्य सभा पक्षासाठी सोयीच्या असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात होतील, याची मात्र काळजी घेतली. किंबहुना त्या चार जागा आमच्याच, असा थेट दावाच त्या-त्या ठिकाणी केला.
जाता-जाता : लोकसभेला भाजपकडून संजयकाकाच पुन्हा उतरतील, हे आता निश्चित झालंय. (चंद्रकांतदादांनाही त्यांच्याशी जुळवून घ्यायला लागलं असावं...) काकांना थेट दिल्ली-नागपुरातून रसद मिळतेय. मतदारसंघातल्या गावागावांत त्यांनी आपल्या तालमीतले पैलवान तयार केलेत. त्यात सगळ्या पक्षांतल्या वस्ताद-पैलवानांशी त्यांनी ‘मैत्र’ जपलंय. विधानसभा नव्हे तर लोकसभाच, असं म्हणून त्यांनी कधीचाच शड्डू ठोकलाय. त्यामुळं काकांना टक्कर द्यायची तर पैलवान तगडा-तयारीचा पाहिजे, हे काँग्रेसच्या वस्तादांनी ओळखलंय...
म्हणूनच लोकसभेच्या पैलवानावर जनसंघर्ष यात्रेत त्यांनी चकार शब्दही काढला नसावा!

विधानसभेच्या कुस्तीची जिल्ह्याला प्रतीक्षा

1 सांगली शहरात वसंतदादा, मदनभाऊ आणि कदम गटांचे पैलवान आपापल्या वस्तादांच्या इशाºयावर लढत असतात. अलीकडं कदम आणि मदनभाऊ पाटील घराण्यात नातेसंबंध निर्माण झाल्यानं विश्वजित कदम यांनी मदनभाऊ गटाला आपल्या आखाड्यात घेण्यासाठी वसंतदादा गटाविरुद्ध दंड थोपटलेत. वसंतदादा गटाचे प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्याशी त्यांचं विळ्याभोपळ्याचं सख्य! महापालिका निडणुकीनंतर जनसंघर्ष यात्रेत ते पुन्हा दिसलं. एवढं की, हर्षवर्धन पाटलांनी भर सभेत सुनावलं. विधानसभेच्या सांगलीतल्या जागेसाठी विशाल पाटील कधीचेच लांग चढवून तयार आहेत, पण विश्वजित यांनी त्यांना काँग्रेसकडून मैदानात जोड म्हणून उतरूच द्यायचं नाही, असं ठरवलंय बहुधा! जनसंघर्ष यात्रेदरम्यान सांगलीत तुफान पोस्टरबाजी झाली. डिजिटल फलकांवर दोघांनीही एकमेकांना टाळलं. आता विधानसभा निवडणुकीत विशाल यांच्याऐवजी मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीतार्इंचं किंवा शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांचं नाव विश्वजित पुढं करतील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही! विश्वजित पद्धतशीर हा ‘घुटना’ डाव टाकतील. विशाल यांच्या सांगलीतल्या कुस्तीची खडाखडी तिकीट मिळवण्यापासूनच सुरू होईल. (आमदार सुधीर गाडगीळांना गुदगुल्या होत असतील तिकडं! अरे आधी पैलवान तर ठरवा, मग बघू, असं जणू ते म्हणत असतील!)

2 सांगली जिल्ह्याच्या आखाड्याची जबाबदारी विश्वजित कदमांनी उचललीय. ते स्वत: पलूस-कडेगावच्या लढतीत उतणार असल्यानं जनसंघर्ष यात्रेतली एक सभा तिथं निश्चित झाली नसती तरच नवल! विश्वजित यांनी स्वत:च्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करून ‘पुढं कोणीही पैलवान असू दे, मी आहेच रिंगणात’, हा मेसेज दिला. वातावरण तापवून त्यांनी पहिली सलामी तर दिली. देशमुख गटाशी खडाखडी करायला त्यांनी शड्डू ठोकलाय. पतंगरावांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीतली भावनिक साद यापुढं चालणार नाही, तर आता जनसंघर्षातून जनसंपर्क वाढवला पाहिजे, हे त्यांना पक्कं माहीत झालं असावं बहुधा.
जत, सांगली खानापूर, पलूस-कडेगाव मैदानात काय होणार?

काँग्रेस-राष्टवादीची आघाडी झाली तर जतमध्ये कुणाचा पठ्ठा मैदानात उतरणार, हा गुंता सुटायच्या ऐवजी वाढलाय. विश्वजित कदम यांनी त्यांचे मावसबंधू विक्रम सावंत यांच्यासाठी तिथं सभा ठेवली आणि उमेदवारीचा पुकारा केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही ‘जतची जागा यावेळी काँग्रेसकडंच’, असं सांगत सावंतांना तयारीला लागण्याचे इशारे केले. जतची जागा आपल्याकडं आणि मिरजेची राष्टवादीला देऊन मिरजेसाठी धडपडणाºया प्रतीक-विशाल गटाला ‘ढाक’ लावण्याची तयारी विश्वजित यांनी केलीय, एवढं नक्की! २००९ मध्ये राष्टवादीकडून थांबलेल्या विलासराव जगतापांच्या विरोधात तालुक्यातली अख्खी काँग्रेस विसर्जित करून, तेव्हा भाजपकडून थांबलेल्या प्रकाश शेंडगेंकडं वळवण्यात आली होती. मागच्या वेळी मात्र जगतापांनी कुस्तीतला तोच ‘बॅक थ्रो’ डाव वापरत भाजपकडून तिकीट घेऊन स्वतंत्र लढणाºया काँग्रेसच्या विक्रम सावंतांना आणि राष्टÑवादीकडून लढणाºया प्रकाश शेंडगेंना अस्मान दाखवल होतं. आता काँग्रेसमधून राष्टÑवादीत गेलेल्या सुरेश शिंदेंसारख्यांना जगतापांनी हाताशी धरलंय. त्यामुळं विक्रम सावंतांसाठी जतच्या मैदानातली माती मऊ लोण्यासारखी व्हावी, या उद्देशानं विश्वजित यांनी तिथं सभा ठेवली. पण सावंतांवर खार खाऊन असलेले राष्टÑवादीतले पैलवान हा डाव कसा उलटवायचा, याचे धडे नव्या वस्तादांकडून घ्यायला सुरुवात करतील, त्याचं काय?

विट्याचे सदाभाऊ पाटील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपासून जरा लांबच गेले होते. कदम गटाचं शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबरांशी नेहमीच ‘अंडरस्टँडिंग’असल्यानं सदाभाऊ नाराज आहेत. अर्थात भाजपमधल्या खासदार संजययकाकांशी त्यांचा वाढलेला दोस्ताना हेही एक कारण आहेच. संजयकाकांना बाबरही नकोत आणि आटपाडीचा गोपीही नकोय. (‘टोपी की गोपी’, हा त्यांचा संभ्रम आता दूर झालाय, बरं का!) त्यामुळं ते सदाभाऊंना आपल्या तालमीत ओढण्यासाठी कमळाचं जाळं लावून बसलेत. चंद्रकांतदादा पाटील, सुभाषबापू देशमुख, अमरसिंह देशमुख या भल्याभल्यांनी सदाभाऊंना ‘आॅफर’ दिलीय, पण सदाभाऊ पक्के तयारीचे. वाडवडिलांची ‘पुण्याई’ ते अशी थोडीच सहजासहजी कुणाच्या परड्यात टाकतील! अशोक चव्हाणांच्या कानावर हे गेलं आणि त्यांनी भाऊंना भिवघाटात गाठलं. सदाभाऊच खानापूर-आटपाडीचे नेते असल्याचं सांगत, त्यांनी ‘एकचाक’ डाव टाकला. भाऊंनीही जनसंघर्ष यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. भाऊंची माया अशी पातळ नाही होणार, या आशावादावर संजयकाका अजूनही बसलेत. शेवटी सदाभाऊ हाताशी नाही लागले, तर अनिलभाऊ येतीलच, अशी काकांची धारणा आहे...

Web Title:  Salam shakti, now Khandakhali - cause-politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.