तीन दशकांत बदलली मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 02:21 AM2018-01-21T02:21:19+5:302018-01-21T02:21:24+5:30

अलीकडचे माझे कामाचे ठिकाण नरिमन पॉइंटच्या एका इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर होते. माझ्या टेबलासमोर मोठी आडवी काचेची खिडकी होती. त्यातून उंच इमारती, एका इमारतीच्या मधल्या मजल्यावर असलेला बगिचा आणि तरण तलाव, त्यांच्या मधल्या अरुंद फटीमधून थोडासा समुद्र आणि आकाशाचा एक तुकडा तेवढा दिसत असे.

 Mumbai changed for three decades | तीन दशकांत बदलली मुंबई

तीन दशकांत बदलली मुंबई

Next

- सुलक्षणा महाजन

अलीकडचे माझे कामाचे ठिकाण नरिमन पॉइंटच्या एका इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर होते. माझ्या टेबलासमोर मोठी आडवी काचेची खिडकी होती. त्यातून उंच इमारती, एका इमारतीच्या मधल्या मजल्यावर असलेला बगिचा आणि तरण तलाव, त्यांच्या मधल्या अरुंद फटीमधून थोडासा समुद्र आणि आकाशाचा एक तुकडा तेवढा दिसत असे. दूरवर मलबार डोंगराचा लहान तुकडा आणि त्यावरच्या उत्तुंग इमारत२२ींचे आकार दिसत. दरवेळी खिडकीबाहेर बघितले की जुन्या मरिन ड्राइव्हच्या आठवणी जाग्या होऊन त्यात हरवून जायला होत असे. भानावर आल्यावर मात्र ती मुंबईच हरवून गेल्याची वेदना मनात असे.

मुंबईमध्ये इतकी आकर्षणे आहेत की त्यामुळे मुंबईमध्ये सहसा कंटाळा येत नाही. मुंबईमध्ये कोणाला, कधी आणि कशाचे आकर्षण वाटेल आणि कशाचे नाही याचा तर थांगपत्ता लागणार नाही. मीही त्याला अपवाद नाही.
साठसालच्या मध्यावर जेंव्हा मी मुंबईत शिकायला आले तेंव्हापासून आजतागायत मला वाटणारे मुंबईचे आकर्षण कधी कमी झाले नाही. मात्र या आकर्षणाची कारणे सतत बदलत गेली. मुंबईचे मला सर्वप्रथम भावलेले आकर्षण म्हणजे मरिन ड्राइव्हचा सुंदर बाकदार किनारा. होस्टेलच तेथे असल्यामुळे समुद्रदर्शन रोजच होत असे. संध्याकाळी परत आल्यावरचा सर्वांत छान कार्यक्रम म्हणजे एकतर तेथे फिरायला जायचे नाहीतर होस्टेलच्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमधून पश्चिमेला अस्ताला जाणारे लाल सूर्यबिंब आणि भोवतालचे केशरी छटांचे आकाश बघत उभे राहणे. अर्थात जूनमध्ये आल्या आल्या हे शक्य नसे; कारण ढग आणि पाऊस यांनी ते कधी झाकोळले जाईल याचा भरवसा नसला, तरी धुवाधार पाऊस आणि समुद्राच्या उंच उसळणाºया लाटा बघत कसा वेळ जाई ते समजतच नसे. अशा पावसातून चालणाºया लोकांचा हेवा वाटे. काहींच्या छत्र्यांची दुर्दशा आणि त्यांची होणारी तारांबळ बघून मजा येत असे. उंच लाटा अंगावर झेलत तेथून चालण्याचा मोह टाळणे अशक्य असल्यामुळे तेही आम्ही करीत असू. परत आल्यावर केसातील बारीक वाळू धुण्याचा कार्यक्रम करावा लागे. आणि कधी कधी मेट्रनची बोलणीही खावी लागत. पावसाळा संपून समुद्र शांत झाला की त्यावर पळणारी मोटारबोट आणि त्यामागे दोरीला धरून वेगाने तरंगत जाणारे सर्फवीर बघितले की त्यांचा हेवा वाटे आणि त्यांच्या दिमाखदार खेळाकडे बघत राहावेसे वाटे.
होस्टेलच्या बाल्कनीतून दिसणारी मलबार हिलची उत्तरेकडची तेंव्हाची टेकडी गर्द हिरव्या वनराईने आच्छादलेली होती. क्वचित त्यातून लाल कौलारू उतरती छपरे दिसत. दक्षिणेकडील किनारा दूर, कफपरेडच्या पलीकडेपर्यंत दिसत असे. तेंव्हा नरिमन पॉइंटची जमीनभरणी नुकतीच सुरू झाली होती. जमीनच नसल्याने इमारती असण्याचा प्रश्नच नव्हता. बाकदार समुद्रकिनारा, आकाश आणि हिरवे डोंगर हे मुंबईचे वैभव डोळे भरून बघणे हा तेंव्हाचा सर्वांत मोठा आनंद होता. आजही त्या आठवणींतील दृश्ये मनाला आल्हाद देतात.
जे.जे. महाविद्यालयात शिकत असताना मुंबईतील नव्या-जुन्या इमारती बघत हिंडणे हा आमचा अभ्यासाचा भाग होता. पुढे तो माझा छंद बनला. नवनवीन इमारतींची बांधकामे बघायला आम्ही मुद्दाम जात असू. कॉलेजमध्ये असतानाच ‘उषाकिरण’ ही उत्तुंग इमारत मलबार हिलच्या एका टोकाला उभी राहिली. दुसºया टोकाला नरिमन पॉइंटच्या किनाºयावर एअर इंडिया आणि ओबेराय हॉटेलच्या उंच इमारती अवतरल्या. खूप अभिमान वाटला होता तेंव्हा. मुंबई आता आधुनिक आणि अद्ययावत होत आहे म्हणून छान वाटले होते. त्यानंतर मात्र पुढच्या काही दशकांत उत्तुंग इमारतींच्या बांधकामांचे पेवच फुटले मुंबईत. आता तर गलिच्छ श्रीमंती आणि बकाल झोपडवस्त्या यांच्या सहकारी झोपू योजनांच्या उत्तुंग आणि कुरूप इमारतींची स्पर्धाच सुरू आहे मुंबईत.
गेल्या तीन दशकांत तर बेढब इमारतींनी मुंबईचे संपूर्ण आकाश गिळंकृत केले आहे. वास्तुरचनाकार आणि नगररचनाकार म्हणून आम्ही विनातक्रार, सामूहिकपणे मुंबईची किती आणि कशी दुर्दशा केली हे बघून रागही येतो आणि दु:खही होते. एकेकाळी मुंबईला दिमाखदार बनवणारी, जागतिक कीर्ती मिळवून देणारी वास्तुकला दुर्दैवाने आता राजकारणी, बिल्डर आणि नोकरशाही फेकत असलेल्या चटई क्षेत्राच्या तुकड्यांसाठी लाचार झाली आहे.

Web Title:  Mumbai changed for three decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई