Karnatak Election 2018 रेड्डी बंधू पुन्हा सत्तेचे सौदागर ठरणार?

By तुळशीदास भोईटे | Published: May 10, 2018 10:03 AM2018-05-10T10:03:23+5:302018-05-10T10:03:23+5:30

कर्नाटकच्या महासंग्रामात मोठ्या नेत्यांची माहिती देताना रेड्डीबंधूंवर म्हणजेच त्यातील गली जनार्दन रेड्डींवर लिहिलेले अनेकांना खटकेल. मात्र बदनाम असले तरीही सत्तेच्या राजकारणात केवळ प्याद्याची नाही तर प्रसंगी सूत्रधाराचीही भूमिका बजावणाऱ्या रेड्डींशिवाय कन्नड राजकारणाचा विचार होऊ शकत नाही. त्यांच्या हालचाली किंवा कारवाया हे राजकीय समीकरणे घडवतात किंवा बिघडवातही.

Karnatak Election 2018 Will Reddy brothers become power traders again? | Karnatak Election 2018 रेड्डी बंधू पुन्हा सत्तेचे सौदागर ठरणार?

Karnatak Election 2018 रेड्डी बंधू पुन्हा सत्तेचे सौदागर ठरणार?

  • एका पोलीस शिपायाच्या घरी जन्म.
  • ज्यांचा पगार होता फक्त काही हजार
  • त्याच कुटुंबाची मालमत्ता एवढी की मुलीच्या लग्नावर ५०० कोटी खर्चाची चर्चा

 

  • केलेला व्यवसाय तोट्यात
  • गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या शेकडो कोटींचा बोजा
  • सर्वांचे व्याजासहित पैसे परत, देशातील पहिला तसा कंपनीमालक असल्याची रिझर्व्ह बँकेकडून प्रशंसा

 

  • हात घातलेल्या व्यवसायात अपयश
  • फायनान्स, खाण कोणत्याही व्यवसायात फारशी गती नाही
  • दहा लाख भांडवलात सुरु केलेली ३० कोटी उलाढालीची कंपनी ३००० कोटींवर

 

  • राजकीय समर्थकाला काँग्रेसने नाकारली होती उमेदवारी
  • घोटाळ्यांच्या आरोपाखाली चार वर्षे गजाआड, नेत्यांनीही फिरवली होती पाठ
  • भाजपकडून सर्व नियम बदलत आठ समर्थकांना उमेदवारी

 

प्रतिकुलतेतून कमालीच्या यशापर्यंतचा परिस्थितीतील बदल हा अगदी चित्रपटातील नाट्यमय घटनाक्रमासारखाच.  मात्र चित्रपटातील नसून प्रत्यक्षात घडलेला घटनाक्रम आहे. तोही एकाच व्यक्तीच्या, त्यांच्या कुटुंबाच्याबाबतीत घडलेला. ही व्यक्ती म्हणजे कर्नाटकच्या महासंग्रामातील सर्वात वादग्रस्त आणि आकर्षणाचे केंद्र असलेले गली जनार्दन रेड्डी अर्थातच जी.जनार्दन रेड्डी. खाणसम्राट. बेल्लारी या एका अख्ख्या जिल्ह्याचा सम्राट. बेल्लारीचा दगड जरी हलवायचा असेल तर ज्यांची परवानगी लागतेच लागते असं म्हटलं जात असे ते गली जनार्दन रेड्डी. रेड्डींच्या नाट्यमय जीवनावर चित्रपटही आला होता. चाललाही. चालणार कसा नाही. मुळात चालला नसता तरी चालवला असता. रेड्डींमध्ये तेवढी ताकद आणि कुशाग्र बुद्धीही आहे. ती योग्यवेळी वापरुन आपल्यासोयीनुसार परिस्थिती बदलण्याचे प्रसंगावधानही. 

गली जनार्दन रेड्डी. वय वर्षे ५१. ११ जानेवारी १९६७चा जन्म. पोलीस शिपाई चेंगा रेड्डी, रुक्मिणीमा रेड्डी या दांपत्याच्या चार मुलांपैकी मधला. दोन भाऊ. एक बहीण. जनार्दन दहावीनंतर पुढे शिकले नाही. भाऊ बेल्लारीत. त्यामुळे रेड्डी कुटुंबाने तेथेच व्यवसाय करायचे ठरवले. एका फायनान्स कंपनीसाठी काम करताना जनार्दन रेड्डी यांनी सर्व कौशल्य शिकून स्वत:ची फायनान्स कंपनी सुरु केली. इनोबल इंडिया सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी. ३५० कोटीची उलाढाल. दक्षिण भारतात कार्यक्षेत्र. मात्र फायदा काही फारसा झाला नाही. २००३पासून ठेवी बंद. सर्वांना परत. तसं करणारा पहिला फायनान्स कंपनी संचालक असल्याने आरबीआयने कौतुक करणारे पत्र दिले. अर्थात तसं उगाच केलं नव्हतं, ते पुढे इतर फायनान्स कंपन्यांच्या मालकांची जी गत झाली ती पाहून लक्षात येते. 

मात्र ती ताकद अशीच आली नव्हती. त्यामागे होती लोखंडातून सोने निर्माण करण्याची कला, असे उगाचच म्हटले जात नाही. तसंच राजकारणातील प्रभावशाली माणसांना हेरुन, येनकेनप्रकारेण आपलेसे करुन आपले हित साधत आपला प्रभाव वाढवण्याची चतुराई. तत्कालिन आंध्रप्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्याशी जनार्दन रेड्डींचे चांगले संबंध असल्याने त्यांना अनंतपुरमध्ये खाणकामाचे परवाने मिळाले, त्याचा रेड्डींना खूपच फायदा झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र त्याची सुरुवात जनार्दन रेड्डींच्या संघर्षाच्या काळात झाली. वाय.एस.आर. रेड्डींचे वडिल वाय.एस.राजा रेड्डी यांच्याशी जनार्दन रेड्डींनी ओळख करुन घेतली. त्यांच्यामाध्यमातून वायएसआरच्या गोटात प्रवेश मिळवला. पुढे जनार्दन रेड्डींनी वायएसआर यांचा मुलगा जगनमोहनलाही सोबत घेतले. कडप्पा जिल्ह्यात 'ब्राह्मणी' समूह सुरु केला. हजारोंना रोजगार मिळाला. मुलीच्या नावाने सुरु केलेल्या या उद्योगानंतर रेड्डींचे साम्राज्य वाढले. हा पोलाद प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच फायद्यात आला होता. कवडीमोलाने जमीन, वीजप्रकल्पाचे पाणी या प्रकल्पाकडे वळवले गेले असे अनेक फायद्याचे निर्णय आंध्र सरकार घेत राहिले आणि ब्राह्मणी समूहाचा फायदाही वाढतच गेला. 

ही व्यावसायिक प्रगती होण्यापूर्वीही रेड्डींनी आपले आर्थिक साम्राज्य वाढवण्यासाठी राजकारणाचा करता येईल तेवढा वापर करुन घेतला. त्यासाठी ते राजकारणात आपला प्रभाव वाढवत राहिले. जे सोबत आले नाही त्यांची साथ सो़डून साथ देणारे शोधत राहिले. मुळात बेल्लारी काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसला साथ देणाऱ्या जगन्नाथ रेड्डींचा सहकारी श्रीरामुलू यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. तेव्हा त्यांनी भाजपाची वेगळी वाट निवडली. त्याच दरम्यान १९९९मध्ये तेथे लोकसभा पोटनिवडणूक लागली. सोनिया गांधी स्वत: उमेदवार. भाजपाने सुषमा स्वराज यांना मैदानात उतरवले. जगन्नाथ रेड्डींनी सुषमा स्वराजना मजबूत साथ दिली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांविरोधात सुषमा स्वराज पराभूत होणे स्वाभाविकच होते. मात्र त्यांनी चांगली लढत दिल्याने त्यांचे राजकीय स्थान उंचावले गेले. त्याचबरोबर जगन्नाथ रेड्डींवरचा किंवा एकंदरीत रेड्डी बंधूंवरचा त्यांचा विश्वासही वाढला. रेड्डीबंधूच्या डोक्यावर हात ठेऊन उभ्या असलेल्या सुषमा स्वराज यांचे 'ते' प्रसिद्ध छायाचित्र तेव्हाचेच. 

पुढे जगन्नाथ रेड्डींनी बेल्लारीतही खाणकामाचे परवाने मिळवले. ओबुलापुरम मायनिंग कंपनीच्या माध्यमातून कामास सुरुवात केली. त्यांचा झपाटा एवढा की २००३-४ मध्ये ३० कोटी  असेलेली उलाढाल अवघ्या पाच वर्षात २००९पर्यंत ३००० कोटींपर्यंत पोहचली. शंभर पट वाढ. अविश्वसनीयच. मात्र जगन्नाथ रेड्डींना ते शक्य झाले ते त्यांच्या कार्यशैलीमुळे. त्यामुळेच ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले. कायदा वगैरे सर्व इतर ठिकाणी...बेल्लारीत रेड्डीबंधू म्हणतील तोच कायदा. ज्यात रेड्डींचा फायदा तोच कायदा. सर्व स्तरांवरील, सर्व सेवांमधील बहुसंख्य अधिकारी कागदावर सरकारची सेवा करत होते निष्ठा मात्र रेड्डी बंधूंच्या हितासाठीच वाहिलेल्या होत्या. इतर कंपन्यांना काहीच करता येत नव्हते. जे करायचे त्यांना उत्पन्नातील ३० टक्के करासारखा रेड्डींना द्यावा लागत होता. जे ऐकायचे नाहीत ते बेल्लारीत दिसायचे नाहीत. आर्थिक साम्राज्य वाढत होते. रेड्डीबंधूंबद्दलच्या सुरस चमत्कारिक कथाही वेगाने पसरत होत्या. त्यांचा बेल्लारीतील महाल. त्यातील सोन्याचा वापर. नळापासून सारेकाही सोन्याचे असल्याची चर्चा. त्यांनी बालाजीला अर्पण केलेला ३२ कोटींचा मुकूट. त्यांचा अगदी जेवणासाठीही बंगळुरू ते बेल्लारी हेलिकॉप्टरने प्रवास. त्यासाठी दिमतीला तीन हेलिकॉप्टरचा ताफा. सारेकाही चक्रावून टाकणारे. 

एकीकडे व्यावसायिक प्रगती अतिवेगात होत होती. त्याचवेळी राजकीय घोडदौडही. सुषमा स्वराज्यांचे आशीर्वाद लाभल्यानंतर एक प्रतिष्ठा आपोआपच लाभली. जगन्नाथ रेड्डी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष झाले. पुढे रेड्डीबंधूंनी काँग्रेसला बालेकिल्ल्यातच टक्कर दिली. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या. जिल्ह्यातील खासदार, तीन आमदार भाजपाचेच निवडून आणले. सातत्याने तीन वेळा. प्रथमच बेल्लारीत कमळ एवढे फुलले. २००६मध्ये  भाजपा जनता दल युतीचे सरकार सत्तेत आले. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. येडियुरप्पा उपमुख्यमंत्री. रेड्डीसमर्थक बी.श्रीरामुलू मंत्री झाले. पक्षाने रेड्डींच्या कामगिरीची दखल घेत २००६मध्ये त्यांना विधानपरिषदेवर आमदारकीची संधी दिली. पुढे त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बिनसले. त्यांनी कुमारस्वामींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपाच्या सत्तेचे २० महिने येणे बाकी होते. युती धर्म पाळल्याचे दाखवणे भागच होते. जगन्नाथ रेड्डींवर कारवाई झाली. पक्षातून निलंबित केले गेले. मात्र जनता दलाच्या सत्तेचे २० महिने संपताच कुमारस्वामींनी पद सोडण्यास नकार दिला. दगा दिला. पुढे २००८च्या निवडणुका लागल्या. जगन्नाथ रेड्डींनी येडियुरप्पांसह कर्नाटक पिंजून काढला. देवेगौडा कुटुंब आणि जनता दलाने दगाबाजी केल्याचा कन्नड मतदारांनाही संताप आला असावा. भाजपला ११० जागा मिळाल्या. ते ११० तसेच रेड्डींनी आणलेले ५ अपक्ष आमदार असे समीकरण जुळवत येडियुरप्पांनी बंगळुरुच्या विधानसौंधात मुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला. भाजपाचा दक्षिणेत पहिला मुख्यमंत्री आणणाऱ्या शिल्पकारांपैकी एक रेड्डी बंधूही होते हे कोणालाच नाकारता येणार नाही. त्यानंतर जगनाथ रेड्डीही मंत्री झाले. बेल्लारीचे पालकमंत्रीही.     

आर्थिक सत्ता होतीच त्यात आता राजकीय सत्ता. डोक्यातच गेले असावे. बेल्लारी जणू काही रेड्डींचे खाजगी संस्थान असल्यासारखेच ते वागू लागल्याच्या तक्रारी वाढल्या. विरोधातील कुणालाच काही करता येऊ नये अशीच रेड्डीशाही होती. अखेर काहींनी तेथे आंध्रात आणि येथे कर्नाटकातही हालचाली सुरु केल्या. त्यातच 2009 मध्ये सर्वात मोठे राजकीय आणि व्यावसायिक पाठिराखे वाय.एस. राजशेखर रेड्डींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. तेथे सत्तेवर आलेल्या रोसय्यांच्याविरोधात वायएसआरपुत्राने बंड पुकारले. रेड्डीही आंध्रच्या मुख्यमंत्र्यांच्या काळ्यायादीत जाणे स्वाभाविकच होते. त्यातच बेल्लारीतील टीएनआर मायनिंग कंपनीच्या तपल गणेश यांनी उघड संघर्ष सुरु केला. रेड्डींच्याच कंपनीतील अधिकाऱी अंजनेया यांचे मातीशी इमान जागे झाल्याने त्यांनी रेड्डींच्या बेकायदेशीर कामांचा तपशील उघड केला. अखेर लोकायुक्त संतोष हेगडे यांचा अहवाल आला. जगन्नाथ रेड्डींच्या काळ्या कारवायांचा आरोप करणारा. रेड्डींच्या बेल्लारीतील साम्राज्याला ‘रिपब्लिक ऑफ बेल्लारी’ असे स्वतंत्र संस्थानासारखे संबोधत कारवाई सुचवणारा. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यवर्ती चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवले. १२२२८ कोटींच्या खाण घोटाल्याचा आरोप झाला. वायएसआर हयात असताना मिळालेला १७ वर्षांसाठीचा परवाना रद्द झाला. खाणसम्राटावर जणू संकटाच्या दरडी कोसळू लागल्या.

३१ मे २००८ रोजी मंत्रीपदी बसलेल्या जी. जगन्नाथ रेड्डींना ३ ऑगस्ट २०११ मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. त्याचवेळी आयकर चौकशीतही त्यांच्यावर बोट दाखवले गेले. नव्हे आयकर खात्याच्या हाती पुरावेच मिळाले. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर सीबीआयनेही कारवाई केली. दशकभर महाराजासारखे बेल्लारीवर राज्य केलेल्या जगन्नाथ रेड्डींना ५ सप्टेंबर २०११ रोजी अटक झाली. खूप प्रयत्न करुनही ते बाहेर येऊ शकत नव्हते. डोक्यावर हात ठेवलेल्या सुषमा स्वराज यांनी नंतर तेच हात कानावर ठेवले. मला काही माहित नाही. कर्नाटकचे प्रभारी अरुण जेटली आणि प्रदेशाध्यक्षांनाच काय ते ठाऊक अशी भूमिका घेतली. स्वाभाविकच भाजपापासून ते दुरावले.  मधल्या काळात समर्थकांनी बीएसआर काँग्रेस पक्षाचा वेगळा तंबू थाटला. २०१३च्या निवडणुकीत रेड्डीबंधूंच्याच मुद्द्यावर भाजपाला घेरत प्रचार करणारे सिद्धारामय्या सत्तेवर आले. जामीनासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये जामीनासाठी कोट्यवधीची लाच देण्याच्या प्रकरणावरुन अडचणी आणखी वाढल्या. दिवस वाईट आले की जास्तच वाईट येत असतात असे रेड्डीबंधूंना वाटले असावे. त्यांनी चुका सुधारण्यास सुरुवात केली असावी. कर्नाटकातील दलित समाजातील एका वर्गावर प्रभाव असणारा श्रीरामुलू हे रेड्डी समर्थक २०१४ ला भाजपातर्फे बेल्लारीतून खासदार झाले.

अखेर २१ जानेवारी २०१५ ला जगन्नाथ रेड्डींना जामीन मिळाला. ते ४२ महिन्यांनी गजाआडून बाहेर आले. पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. खरेतर काळ्या कारवाया उघड झाल्यानंतर मिळालेला दणका एवढा जबरदस्त असतो की अनेकांना त्यातून सावरणे जमत नाही. मात्र जमीन फोडून लोहखनिज बाहेर काढून सोनेरी साम्राज्य उभारणाऱ्या जी.जगन्नाथ रेड्डींना प्रतिकुलतेशी लढण्यात मजा येत असावी. त्यांनी पद्धतशीर नियोजन केले. प्रतिमानिर्मिती करुन पुनरागमाच्या रणनितीवर काम सुरु केले.

२०१०मध्ये पृथ्वी हा चित्रपट आला होता. त्यात पुनित हा अभिनेता नायक होता. रेड्डींचे बेल्लारी साम्राज्य उद्धस्त करण्याच्या घटनाक्रमावर आधारित हा चित्रपट त्यांच्या वाईट काळात आला होता. रेड्डींची प्रतिमा काळीकुट्ट खलनायकी रंगवणारा. त्यातील पुनित या अभिनेत्याचा भाऊ शिवराजकुमार सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार. जगन्नाथ रेड्डींनी त्याला घेऊन २०१७मध्ये मुफ्ती हा चित्रपट तयार केला. रेड्डींचे उदात्तीकरण करणारा. चांगली कामे करणाऱ्या या नेत्याला कसे अटक करायचे, असा प्रश्न पडल्याने, त्यांच्या अटकेसाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यालाही द्विधा मनस्थितीत दाखवणारा. 

असाच २९ जानेवारी २०१७ चा दिवस. हेमावेमा सोहळ्याचा. लाखोंची गर्दी. जगन्नाथ रेड्डींना मिळालेला प्रतिसाद. लोकप्रियता दाखवून देण्याचा प्रभावी प्रयत्न.तसाच तिसरा प्रयत्न केला तो त्यांची कन्या ब्राह्मणीच्या लग्नाचा. तो तर महासोहळाच. तशी चर्चा तर झाली ५०० कोटी खर्चाची. रेड्डींचा म्युझिक व्हिडिओ दाखवणारी एलसीडी लग्नपत्रिका. त्या पत्रिकांवरच म्हणे पाच कोटी खर्च झाले. बेंगळुरु पॅलेसच्या मैदानात गावांचा, गावांसह कर्नाटकातील हंपीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यावसायिकांनी कौशल्य पणाला लावले होते. कोट्यवधीचा खर्च झाला. पण कारावासाच्या काळ्या आठवणी लोकांच्या मनातील पुसण्यासाठी रेड्डींनी ठरवून खेळलेली ती खेळी होती. प्रतिमानिर्मितीसाठीचीच. 

त्याचवेळी गली जगन्नाथ रेड्डींच्या राजकारण पुनरागमनाच्या चर्चेला आणखी बळ मिळाले. झालेही तसेच. नाही म्हणता म्हणता भाजपाने रेड्डी बंधूंना पुन्हा आपले मानले. अर्थात त्याला काही अंशी कारणीभूत ठरले ते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या. तेच सिद्धारामय्या ज्यांनी रेड्डीबंधूंच्या विरोधात रान उठवत भाजपाच्या सत्तेचे दुकान उठवले होते. त्यांनी लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याची शिफारस केली. त्यांच्या त्या निर्णयामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करुन बसलेल्या भाजपाच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच. ज्या समाजाचे असल्याने येडियुरप्पांना घोड्यावर बसवले ते तो समाज फिरला तर? कर्नाटकच्या राजकारणात दोन समाज प्रभावी. एक वोक्कालिगा. ते देवेगौडांमुळे जनता दलाकडे. आता लिंगायत फिरले तर सत्तेचे स्वप्नच विरेल अशी भीती. त्यामुळे पुन्हा रेड्डी बंधूंना पावन करण्यात आले. एक नाही आठ ठिकाणी उमेदवारी. पाहिजे त्याला. 

त्यामुळेच स्वत: रिंगणात नसले तरी गली जगन्नाथ रेड्डीच सेनापतीच्या भूमिकेत आहेत. त्यांना न्यायालयीन आदेशाने बेल्लारीत प्रवेशबंदी असली तरी शेजारच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलकालमुरु फॉर्महाऊस भाड्याने घेऊन त्यांनी वॉररुम तयार केली आहे. तेथून ते आपल्या सात समर्थकांसह अन्य भाजपा उमेदवारांसाठीही सूत्रे हलवत आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून सत्तेत परतण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या चलतीच्या दिवसात त्यांनी कर्नाटक - आंध्र प्रदेश सीमा लक्षात येऊ नयेत यासाठी अनेक खुणा गायब केल्या, त्यापैकी एक म्हणजे सुगलाम्मा देवीचे पुरातन मंदिर. तिचा शाप त्यांना नडला असे बोलले जायचे. बालाजीला ३२ कोटींचा हिरेजडित मुकूट अर्पण करणारे जगन्नाथ रेड्डी श्रद्धाळू असणारच. त्यामुळे देव कोपतात तसे नेतेही कोपले तर काय होतं त्याचा फटका त्यांना पुन्हा नकोच नको असणार. त्यासाठीच जनताजनार्दनाला प्रसन्न करुन नेत्यांनाही वरदान द्यायला भाग पाडण्यासाठीच त्यांची सत्ता आराधना सुरु असणार. जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर रेड्डीसारख्या सत्तेच्या सौदागरांचे महत्व वाढणारच. कदाचित त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मोठे घबाड हाती लागेल. अनेक समीकरणे साधताना भाजपाला त्यांच्या अर्थ आणि बाहु दोन्ही बळांची मदत लागेलच लागेल. पण जर काँग्रेसला चांगले यश मिळाले तर पुढे काय? तसेच राष्ट्रीय पातळीवर लायबिलिटी ठरणाऱ्या अशा वादग्रस्त नेत्यांचे ओझे, २०१९च्या निवडणुकीची गरज भागल्यानंतर भाजपा सहन करेल? 
 

Web Title: Karnatak Election 2018 Will Reddy brothers become power traders again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.