वीज पुरवठ्यासोबत अनेक अडचणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हेळसांडभंडारा : ‘चला शिकूया, पुढे जाऊया’ यासाठी सर्वशिक्षा अयिभानांतर्गत विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेच्या उद्देशाने लाखो रूपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक संच बसविण्यात आले. मात्र वीज पुरवठा खंडित व संच नादुरूस्त अशा अनेक कारणांनी संगणक शोभेची वस्तु बनले आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणक बसविण्यात आले. मात्र विविध कारणांनी हे संगणक अडगळीत पडले आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित असल्याने तर काही शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव असल्याने हे संगणक धूळखात पडले आहे. गाजावाजा करून शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या संगणकांचा विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान व्हावे, त्यांचे संगणकाचे धडे गिरवून अद्यावत ज्ञान प्राप्त करावे, या हेतूने आलेले संगणक सद्यस्थितीत बंद आहे. सुरूवातीला संगणकासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित असल्याने संगणक बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यात आले व शिक्षकांची तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली. नंतर मात्र शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी प्रगत व्हावे, यासाठी शिक्षण विभागाद्वारा अनेक योजना आखण्यात येत आहेत. दुसरीकडे शाळांमधील संगणक धूळखात असल्याचे दिसून येत आहे. बंद संगणक सुरू करून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
जि.प. शाळांमध्ये संगणक संच धूळखात
By admin | Updated: October 24, 2016 00:41 IST