न्यायालयाचा निर्णय : अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगभंडारा : साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील एका १३ वर्षीय मुलीला पळवून नेवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी भोजू उर्फ भोजराज तेजराम मेश्राम (२३) रा. सेेंदुरवाफा याला सात वर्षांचा कठोर कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश १ तसेच विशेष न्यायालय भंडाराचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सुनावला. याबाबत असे की, सेंदुरवाफा येथील १३ वर्षीय मुलगी ही १९ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गावातीलच किराणा दुकानात गेली होती. त्यानंतर ती घरी परत आली नाही. कुटूंबीयानी तिचा शोधाशोध केला. मात्र ती मिळून आली नाही. दुसऱ्या दिवशी कुटूंबीयानी साकोली पोलीस ठाणे गाठून मुलगी हरविल्याची तक्रार दिली. २३ जानेवारी २०१२ रोजी मुलगी दुपारी घरी दिसली. तेव्हा तिच्या आईने तिची विचारपुस केली. त्यानंतर तिने गावातीलच भोजराज मेश्राम याने एका बांधकाम सुरु असलेल्या खोलीमध्ये नेवून जबरदस्ती करुन अतिप्रसंग केला. रात्रभर तिथे थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी भडंगा येथे घेवून गेला. त्यानंतर २३ जानेवारी २०१२ रोजी रेल्वे स्टेशन पिंडकेपार येथे आणून सोडल्याचे सांगितले. मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन पोलिसांनी भोजराज मेश्राम याच्या विरुध्द भादंवि ३६३, ३६६ (अ), ३७६ कलमान्वये तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत सहकलम ३(१)(१२)अन्वये गुन्हाची नोंद केली. या प्रकरणाची तपासाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण भंडारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश १ आर. पी. पांडे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचे बयाण, पिडित मुलीची साक्ष, वैद्यकिय अधिकारी यांचे अभिप्राय व इतर साक्षीदारांचा पुरावा तसेच वकिलांचा युक्तीवादानंतर निकाल घोषित करण्यात आला. या प्रकरणाला ४ वर्ष ३ महिने १६ दिवसांचा कालावधी लागला. सरकारकडून सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. राजकुमार वाडीभस्मे यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)
युवकाला सात वर्षांचा कठोर कारावास
By admin | Updated: July 4, 2016 00:23 IST